अरविंद केजरीवालांचा हेतू भाजपला मदत करायचा, निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज: माणिकराव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:23 IST2025-10-08T11:22:34+5:302025-10-08T11:23:29+5:30
जिल्हा पंचायत निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसने सर्व सज्जता ठेवली आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

अरविंद केजरीवालांचा हेतू भाजपला मदत करायचा, निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज: माणिकराव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'गोवा फॉरवर्ड व आरजीने आधी आपली भूमिका स्पष्ट करू दे. नंतरच त्यांच्यासोबत निवडणुकांना सामोरे जायचे की नाही हे ठरवू जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज आहे,' असे काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्ल्स फेरेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, अ. भा. काँग्रेस समितीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसने सर्व सज्जता ठेवली आहे. राखीवता कशी असेल, संभाव्य उमेदवार व इतर बाबतीत चर्चा झालेली आहे. जिल्हा पंचायत तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 'इंडिया आघाडी' अस्तित्वात असणार आहे का, असा प्रश्न केला असता ठाकरे म्हणाले की, आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा हेतू भाजपला मदत करण्याचा दिसतो. गोव्यात काँग्रेस मजबुतीने पुढे जात असताना ते अशा प्रकारे का वागतात हे आम्हालाही समजत नाही. आम्ही विशिष्ट विचारधारेने पुढे जात आहोत व सर्व विरोधी पक्षाने एकत्रपणे भाजपशी लढावे, असा असा आमचाही दृष्टिकोन आहे. परंतु आम आदमी पक्ष भाजपशी लढतोय की काँग्रेसशी, हे कळायला मार्ग नाही.
ठाकरे म्हणाले की, गोव्यात अनेक वर्षे काँग्रेस पक्ष लढतोय. विजयी होतोय. लोकांचा काँग्रेसवर ठाम विश्वास आहे. काँग्रेसमधून फुटून भाजपात गेलेल्या आमदारांची काय अवस्था झाली आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. गोवा फॉरवर्ड व आरजीकडे युत करणार का? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, याबाबतीत या पक्षांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ.
विजय सरदेसाई यांना काँग्रेसमधील एक विशिष्ट गट रोखत आहे का? असा प्रश्न विचारला असता काँग्रेसमध्ये कोणीही कोणाला रोखण्याचा प्रश्न नाही, असे ठाकरे म्हणाले. राहुल गांधी, तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जो काही निर्णय घेतील तो सर्वांना शिरोधार्ह असेल, असे ते म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुका व आगामी विधानसभा निवडणुका पाटकर यांच्याच नेतृत्वाखाली लढणार का? या प्रश्नावर ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. ते म्हणाले की, त्यावर मी बोलू शकत नाही. कारण, ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिकार आहेत. सध्या तरी पाटकर अध्यक्ष आहेत. पक्षाचे काही अंतर्गत निर्णय असतात आणि पक्षाची पद्धत ठरलेली आहे. त्यानुसारच काय ते होईल. दोन-चार लोकांच्या तक्रारी आल्या म्हणून त्यावर कोणाला काढायचे किंवा काय हे ठरत नसते.
ठाकरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी बरोबरच वोट चोरी विरोधातील सह्यांच्या मोहिमेबाबतही चर्चा झाली. ते म्हणाले की, पाच मतदारसंघात ही मोहीम केली. तसेच, काँग्रेस गटाध्यक्षांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.
खुल्या चर्चेला तयार : ठाकरे
केजरीवाल मागील दाराने मोदींना भेटतात व उलट अमित पाटकरांवर आरोप करतात. अमित पालेकर यांचे खुल्या चर्चेचे आव्हान मी स्वीकारतो, असे ठाकरे यांनी एका प्रश्नावर सांगितले. ते म्हणाले की, पालेकरांनी वेळ व ठिकाण ठरवावे. मी चर्चेला येण्यासाठी तयार आहे.
महिनाभरात मंदिरे खाण लीज क्षेत्राबाहेर काढून दाखवा : पाटकर
अमित पाटकर म्हणाले की, सरकारने देवळांचा लिलाव केला, या माझ्या विधानाशी मी ठाम आहे. सरकारने शिरगावचे लईराई मंदिर व मुळगावचे केळबाई मंदिर महिनाभराच्या आत खाण लीज क्षेत्राबाहेर काढावे, असे आव्हान मी देतो. सरकारने हे आव्हान स्वीकारावे व दोन्ही मंदिरे क्षेत्राबाहेर काढावीत.
पाटकर म्हणाले की, मी काहीही गैर बोललेलो नाही. माझी आई अडवलपाल येथील होय. देवळे लिलावात काढून भाजपनेच हिंदू धर्माचा अपमान केला आहे. २०१८ पासून मागणी होत असूनही ही मंदिरे सरकारने लीज क्षेत्राबाहेर का काढली नाहीत, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे.
पाटकर म्हणाले की, खुद्द देवस्थानचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांची मंदिर लीज क्षेत्रात असल्याने हायकोर्टात याचिका आहे. मी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. हे सरकार देवाचा लिलाव करणारे आहे. पर्वरी येथे खाप्रेरश्वर देवाची मूर्ती लोकांचा प्रचंड विरोध असताना हलवली.
खाणींच्या बाबतीत आपल्यावर आरोप करणारे अमित पालेकर कोण? असा सवाल पाटकर यांनी केला. साडेतीन वर्षे पालेकर झोपले होते काय?, असा प्रश्न पाटकर यांनी केला.