अरविंद केजरीवालांचे भाजपशी संगनमत: माणिकराव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:18 IST2025-10-07T11:16:40+5:302025-10-07T11:18:00+5:30
फूट घालण्याचेच हे कारस्थान, काँग्रेसच्या बैठकांचे सत्र

अरविंद केजरीवालांचे भाजपशी संगनमत: माणिकराव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केजरीवालांचे भाजपशी संगनमत असून त्यांच्या दौऱ्यामागे विरोधकांमध्ये फूट घालण्याचेच कारस्थान आहे, असा आरोप काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. माणिकराव सध्या गोवा भेटीवर असून त्यांनी बैठकांचे सत्र लावले आहे. काल गटाध्यक्षांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले, तसेच व्होट चोरीविरोधी मोहिमेत कुडतरी, वेळ्ळी, नावेली व मडगाव या चार मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांना संबोधले.
ठाकरे 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, 'केजरीवाल ज्या पद्धतीने विधाने करताहेत, ते पाहता भाजपशी त्यांनी संगनमत केले आहे की काय? असा संशय येतो. येथे येऊन अशा प्रकारे वातावरण कलुषित करण्याची गरज नव्हती. भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्याचे सोडून केजरीवाल विरोधकांमध्येच फूट पाडत आहेत. त्यांची विधाने भाजपला मदत करण्यासाठीच आहेत. यातून ते काय साध्य करू इच्छितात हे त्यांनाच ठाऊक. ठाकरे पुढे म्हणाले की, प्रश्न विचारांचा आहे. आपचे नेते भाजपच्या विरोधात नव्हे, तर काँग्रेसच्या विरोधात असल्यासारखे बोलतात. विरोधकांची मते फोडण्याचेच हे कारस्थान दिसते.'
'केजरीवालनी साखळी, वाळपईला जाहीर सभा का घेतल्या नाहीत?'
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, केजरीवाल हे भाजपला मदत करण्यासाठीच गोव्यात आले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, 'आप खरोखरच गंभीर असता, तर साखळी किंवा वाळपईला जाहीर सभा का घेतली नाही? लोकांना जर गोवा फॉरवर्ड, आरजी यांच्यासोबत काँग्रेसने युती केलेली हवी असेल, तर आमच्या नेतृत्त्वाला लोकांच्या भावना कळवू,' पाटकर म्हणाले की, 'केजरीवाल ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवून जाहीर व्यासपीठावर काँग्रेस विरोधात व माझ्याविरोधात बोलले. मयेतील विधानानंतर मी त्यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.
पाटकरांनी लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या : भाजप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदू देवदेवता अपमान करून लाखो भाविकांच्या भावना दुखावत असल्याची टीका भाजप गोवाने केली आहे. शिरगाव येथील देवी लईराई मंदिर सरकारने विकल्याचे विधान पाटकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा भाजपने निषेध केला आहे. त्यांनी केलेली टिप्पणी लज्जास्पद असल्याचे भाजपने म्हटले आहे.
दरम्यान, शिरगाव येथील देवी लईराई मंदिर सरकारने विकले असल्याच्या पाटकरांच्या विधानाचा लईराई मंदिर अध्यक्षांनी देखील निषेध केला आहे. अशा प्रकारचे विधान करून त्यांनी देवस्थान तसेच सर्व भाविक व भक्तांचाही अपमान केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.