“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:15 IST2025-10-04T19:14:35+5:302025-10-04T19:15:30+5:30
AAP Chief Arvind Kejriwal Goa Visit: भाजपा आणि काँग्रेसमध्ये निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवालांनी केली.

“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
AAP Chief Arvind Kejriwal Goa Visit: राज्यातील जनतेचा भाजपा आणि काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. दोन्ही पक्षांकडून राज्यातील जनतेला अजिबात आशा राहिलेल्या नाहीत. केवळ आम आदमी पक्षाकडून त्यांना आशा आहेत, त्यामुळे २०२७ मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो, असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यात आगमन होताच अरविंद केजरीवाल यांनी सदर दावा केला. यावेळी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली. केजरीवाल यांचा हा तीन दिवसांचा दौरा पक्षाच्या संघटनात्मक बैठका आणि नवीन कार्यालयाच्या उद्घाटनावर केंद्रीत असणार आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यात केजरीवाल हे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक तयारीचा आढावा घेणार आहेत.
वरून विरोध, आतून मात्र संगनमत, ही व्यवस्था बदलण्याची गरज
अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपावर अत्यंत धारदार शब्दांत हल्ला चढवला. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या खाण व्यवसायावरून त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला. गोव्यात खाण व्यवसाय मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय सुरू राहू शकत नाही. वरवर पाहता हे दोन पक्ष एकमेकांचे विरोधक असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात ते संगनमत करून काम करतात. ही व्यवस्था आता बदलण्याची गरज आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. हे दोघेही गोव्याच्या लोकांना मूर्ख बनवत आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे, अशी टीका केजरीवालांनी केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात हिंमत नाही
जमिनीचा मालकी हक्क लोकांना देण्यापासून रोखण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात हिंमत नाही. मयेत गेल्या २५ वर्षापासून भाजपाचा आमदार आहे. पण, भाजपाने तुम्हाला काय दिले? रस्त्यांची दुरावस्था झाली, रोजगार नाही, हॉस्पिटलची सुविधा नाही. काही दिवसांपूर्वी प्रमोद सावंत यांनी या जमिनींवर सरकारचा हक्क असल्याचे सांगून मालकी हक्क दिला जाणार नसल्याचे सांगितले. हा धोका आहे. नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क देण्याचे काम आम आदमी पक्ष करेल, त्यासाठी पक्ष लढेल. प्रमोद सावंतांनी हक्क रोखून दाखवावेत, असे झाल्यास आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा केजरीवालांनी दिला.
दरम्यान, सरकारी कार्यालयांत अनेकदा लोकांना योग्य मदत मिळत नाही आणि त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. यावर उपाय म्हणून आम आदमी पक्ष लोकांच्या मदतीसाठी पुढे येणार आहे. तुम्ही आमच्या कार्यालयात या, आम्ही तुम्हाला सर्व कामांमध्ये विनामूल्य मदत करू. गोव्यातील लोकांसाठी अनेक सरकारी योजना आहेत, पण माहितीअभावी स्थानिकांचा गोंधळ होतो. आम्ही तुम्हाला प्रत्येक योजनेबद्दल मार्गदर्शन करू आणि तुम्हाला लाभ मिळेल याची खात्री करू, असा शब्द केजरीवाल यांनी गोवेकरांना दिला.