'एआय' चित्रपटांसाठी मारक ठरेल; जागतिक मराठी संमेलनात महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:56 IST2026-01-10T12:54:27+5:302026-01-10T12:56:25+5:30
भविष्यात एआयची शक्ती एवढी वाढणार की चित्रपट हा एआय गिळंकृत करणार आहे, अशी भीती प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.

'एआय' चित्रपटांसाठी मारक ठरेल; जागतिक मराठी संमेलनात महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता
नारायण गावस, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जगभर सध्या एआयचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. सध्या सोशल मीडियवर व्हायरल होणारे व्हिडिओ हे सत्य आहे की, एआयद्वारे केले जात आहे हे समजणे कठीण झाले आहे. भविष्यात एआयची शक्ती एवढी वाढणार की चित्रपट हा एआय गिळंकृत करणार आहे, अशी भीती प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.
जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजन समितीने कला अकादमीत आयोजित केलेल्या २१ व्या जागतिक मराठी संमेलनातील 'चित्रपटातील मराठी माणूस' या सदरात ते बोलत होते. ब्रिटीश नंदी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
मांजरेकर म्हणाले, आता एआयचा वापर करून चित्रपट बनविण्यासाठी जे पाहिजे जसे पाहिजे ते मिळू शकते. आम्हाला एखाद्या विदेशातील सेट पाहिजे असेल तर एआयद्वारे मिळू शकतो. या वाढत्या एआयच्या वापरामुळे दिवसाला लाखो चित्रपट तयार होऊ शकतात. त्यामुळे चित्रपटाचा दर्जा कमी होणार आहे. जो चित्रपट आता तयार करण्यासाठी जी मेहनत लागते ती भविष्यात कमी होणार आहे.
प्रेक्षकांसाठी कथानक महत्त्वाचे
मांजरेकर म्हणाले की, आता प्रेक्षकांना अभिनेत्यांपेक्षा कथानक महत्त्वाचा आहे. जर आम्ही चांगला कथानक दिला तर प्रेक्षक उचलून धरणार आहे. त्यामुळे पूर्वी जे प्रसिद्ध अभिनेत्याचा नावावर चित्रपट चालत होते, ते दिवस आता गेले आहे. आता प्रेक्षकांना दर्जेदार कथानक हवे आहे. तसेच चांगला संदेश देणारे चित्रपट हवे आहे. अशा चित्रपटांना आता चांगले दिवस आले आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी चांगल्या दर्जाचे कथानक असलेले चित्रपट तयार करण्यावर भर दिली पाहिजे.
जुने चित्रपट ऊर्जा देतात
मांजरेकर म्हणाले, सध्या हिंदी, तामिळ, तेलगु या भाषेतील चित्रपट देशात जोरदार हीट होताना दिसतात. तसे मराठी चित्रपट होत नाही ही चिंतेची बाब आहे. पण त्यामागे मुख्य कारण म्हणजे बजेट. मराठी चित्रपट मोठ्या बजेटचा होत नाही. कुठलाही निर्माता जोखिम घेऊन मोठ्या बजेटचा चित्रपट तयार करायला जात नाही. दाक्षिणात्य सिनेमे हे मोठ्या बजेटचे असतात. त्यामुळे ते प्रेक्षकांना जे हवे जसे हवे ते दाखविले जाते म्हणून हे चित्रपट हाऊसफुल्ल होत असतात.
मांजरेकर म्हणाले, लहानपणी क्रिकेटची आवड होती. सिनेसृष्टीत जाणार हे माहीत नव्हते. पण गल्लीत पडद्यावरील चित्रपट दाखवले जात. ते पाहिल्यानंतर एकांकिका, नाटक स्पर्धात काम करत नंतर सिनेसृष्टीत प्रवेश केला. आजही अनेक जुन्या चित्रपटांच्या आठवणीने मला ऊर्जा मिळते.