सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनात आणखी ३५३ जणांचा सहभाग

By Admin | Updated: February 17, 2015 02:25 IST2015-02-17T02:25:30+5:302015-02-17T02:25:54+5:30

पणजी : गेले दहा दिवस पणजीत आंदोलनासाठी बसलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष

Another 353 participants in the movement of security guards | सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनात आणखी ३५३ जणांचा सहभाग

सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनात आणखी ३५३ जणांचा सहभाग

पणजी : गेले दहा दिवस पणजीत आंदोलनासाठी बसलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आता सुरक्षा रक्षकांतर्फे येत्या गुरुवारपासून प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा घेण्यात येतील. सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनाला आता क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा खात्याच्या कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. कामगारांना यापूर्वीच सेवेतून कमी केले आहे.
कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही सह्यांच्या मोहिमेद्वारे जनतेचे सहकार्य घेण्यासाठी पुढे येणार. तसेच राज्यातील विविध मतदारसंघांत जाहीर सभा घेऊन कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत जागृती करणार असल्याचे सुरक्षा रक्षकांचे नेते अजितसिंग राणे यांनी सांगितले.
ज्येष्ठ कॉम्रेड नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सुरक्षा रक्षक ट्रेड युनियनतर्फे सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी आंदोलनाची पुढील रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. पणजीत आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाला तीव्र स्वरूप आणता येत नव्हते. मात्र, आता आम्ही विविध शहरांत जाऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न जनतेसमोर मांडणार असल्याचे राणे यांनी सांगितले. पाच खात्यांतील कर्मचारी नोकरीत कायम करावे म्हणून आंदोलनासाठी बसले होते. त्यात आज क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा प्राधिकरणाचे १४५ तर क्रीडा खात्याचे २0८ कर्मचारी सुरक्षा रक्षकांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावरील आंदोलनात आज सोमवारपासून सहभागी झाले आहेत, असे राणे यांनी सांगितले.
आंदोलनात सहभागी झालेले नागरिक विविध भागातील आहेत. त्यामुळे स्थानिक आमदारांनाही कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात येईल. आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणी करून सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली जाईल, असे सुरक्षा रक्षकांच्या नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Another 353 participants in the movement of security guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.