गोव्यात पक्ष विस्ताराचा होता अजित पवार यांचा प्रयत्न; पण पक्षाचे काम पुढे गेलेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 08:40 IST2026-01-29T08:38:57+5:302026-01-29T08:40:01+5:30
प्रफुल्ल पटेल यांच्यावर होती विशेष जबाबदारी

गोव्यात पक्ष विस्ताराचा होता अजित पवार यांचा प्रयत्न; पण पक्षाचे काम पुढे गेलेच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातही राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाची स्थापना करून येथेही पक्षाचा विस्तार करण्याचे अजितदादांचे स्वप्न होते. त्याच अनुषंगाने ऑक्टोबर २०२३ मध्ये शंभू मधुकर परब यांची गोवा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु पुढे या पक्षाचे काहीच काम झाले नाही. गोव्यात पक्ष काम वाढविण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्यावर अजित पवार यांनी जबाबदारी सोपवली होती पण गाडी हवी तशी रुळावर कधी येऊ शकली नाही.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर गोव्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची राजकीय घडी विस्कटली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवार उभे केले तरी एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर पक्षाच्या हालचाली मंदावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने गोव्यात पक्षाची नवी संघटनात्मक रचना उभारण्याचे स्वप्न ठेवून गोव्यात प्रवेश केला. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे अनुभवी प्रभारी अजित पवारांकडे होते. त्यामुळे गोव्यात हा पक्ष मूळ धरेल, असे त्यावेळी वाटले होते. प्रफुल्ल पटेल यांचा संपर्क गोव्यात काही ठिकाणी आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काम वाढविण्यासाठी गोव्यात खास असा प्रयत्न प्रफुल्ल पटेल यांनीही कधी केला नाही.
३ ऑक्टोबर २०२३ रोजी गोवा प्रदेशाध्यक्षपदी शंभू मधुकर परब यांची नियुक्ती करणारा आदेश राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काढला होता. प्रदेशाध्यक्ष शंभू परब यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही किंवा एकही कार्यक्रम राबवला नाही. अलिकडे उत्तर गोव्यातील मांद्रे मतदारसंघात काही युवकांनी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे काम थोडेफार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. काही कार्यक्रमही झाले.
दरम्यान, 'विमान अपघातात अजित पवार यांच्या झालेल्या दुर्दैवी निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही मोठी हानी आहे. या घटनेची महाराष्ट्र सरकारने सखोल चौकशी करावी' असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी म्हटले आहे. अजित पवार हे मोठे नेते होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. शरद पवार गट व अजित पवार गट लवकरच एकत्र येणार होते. परंतु, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. परंतु अजित पवार यांच्या रूपाने आम्ही एक मोठा नेता गमावला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पेडणेत चाचपणी, पण...
दरम्यान, गोव्यात राष्ट्रवादीचे काम वाढविण्याचा प्रयत्न होता. प्रफुल्ल पटेल यांच्यावर अजित पवार यांनी गोव्याची जबाबदारी दिली होती. पटेल यांनी सुरुवातीला जुझे फिलीप डिसोझा यांना व टीमला गोव्यात जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती पण जुझे फिलीप यांनी नकार दिला व कायम ते शरद पवार यांच्या सोबत राहिले. पटेल यांनी महाराष्ट्रातील काही युवकांना गोव्यात पाठवून विशेषतः उत्तर गोव्यात चाचपणी केली होती, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. अजित पवार यांच्या पार्टीचे काम मांद्रे मतदारसंघात काही युवक करताना दिसूनही येतात परंतु त्यात फारसे यश आले नाही.
'महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. जनसेवेसाठी समर्पित, अनुभवसंपन्न आणि कटिबद्ध नेतृत्व आम्ही गमावले आहे. शोकाकुल कुटुंबीय, समर्थक आणि सर्व दुःखी मनांसोबत माझ्या संवेदना. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो.' - अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, गोवा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांच्या जाण्याने राजकीय गुरू आणि प्रेरणास्थान गमावले आहे. त्यांनी केवळ राजकारण शिकवले नाही, तर जनतेसाठी कसे जगायचे हेही शिकवले. लवकरच पणजी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करणार होते. त्याची तयारी सुरू असताना त्यांचे अचानक जाणे कार्यकर्त्यांसाठी धक्का आहे. देशाने एक धाडसी, कणखर आणि जनतेशी नाळ जुळवणारा नेता गमावला आहे. त्यांचे कार्य कायम हृदयात जिवंत राहील' - चैतन्य मानकर, अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले है दुर्दैवी आहे. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा होते. तळागळातील लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. त्यांच्या सारखा एक हुशार नेता जाणे हे खरेच धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांना मिळो. - दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष
गेल्या वर्षी मी एक निमंत्रण घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो तेव्हा अजितदादांची भेट घेतली. ते अत्यंत संयमी नेते होते. ते दिलेला शब्द पाळणारे होते. काम होत असेल तर थेट सांगायचे, न पेक्षा आपल्याकडे काम होणार नाही, असेही स्पष्टपणे सांगायचे. मध्यंतरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. राजकारणात अशा गोष्टी घडतच असतात. - जुझे फिलिप डिसोझा, गोवा प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अपघाती निधनीची बातमी समजली आणि मन सून्न झाले. २९ जानेवारी २०२४ या दिवशी त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर होतो तो क्षण अगदी काल-परवा झाला असा सतत भास होतोय. पुरस्कार अजितदादा यांच्याहस्ते स्वीकारला होता. माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी खूप मोठा सन्मान होता. -निखील वाघ, जनसंपर्क अधिकारी, गोवा शिपयार्ड लिमिटेड