राज्यातील एक शिक्षकी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:24 IST2025-09-06T12:22:46+5:302025-09-06T12:24:37+5:30
रोबोटिक्स, कोडिंग प्रमाणे सायबर सुरक्षा अभ्यासक्रमही लागू

राज्यातील एक शिक्षकी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. यापुढे राज्यात एकही एक शिक्षकी शाळा राहणार नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पणजी येथील कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित राज्य शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दहा शिक्षकांना मुख्यमंत्री वसिष्ठ गुरू पुरस्कार २०२४ -२५ ने सन्मानित करण्यात आले. तसेच तीन भाग शिक्षण अधिकारी कार्यालयांना उत्कृष्ट कामासाठी व "माझी लॅब, भारी लॅब" या उपक्रमाअंतर्गत राज्यातील चार शाळांनाही गौरविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात १४० विनाअनुदानित खासगी शाळा व ७०० सरकारी शाळा आहेत. मात्र तरी देखील सरकारी शाळांच्या तुलनेत विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. याला कारण म्हणजे तिथे इंग्रजी माध्यमातून मिळणारे शिक्षण. परंतु सरकारी शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी विषय शिकवला जातो. याशिवाय सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा आहेत. पालकांनी सरकारी शाळांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघावे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर व समग्र शिक्षाचे प्रकल्प संचालक शंभू घाडी उपस्थित होते.
राज्यातील शाळांमध्ये रोबोटिक्स व कोडिंग हे शिक्षण लागू केले आहे. त्या प्रमाणे आता सायबर सुरक्षा अभ्यासक्रमही लागू केले जाईल. सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये शिक्षक, शाळा व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कारांसाठी कुठल्याही प्रकारची शिफारस केली जात नाही. त्यामुळे जर तसे कुणाला वाटत असेल तर तसे नाही. शिक्षण क्षेत्रात शिक्षकांकडून होणारे उत्कृष्ट काम तसेच अन्य निकषांच्या आधारेच निवड समिती या पुरस्कारांसाठी शिफारस करते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे आहेत पुरस्कार विजेते
छाया बोकाडे : श्री विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा, विठ्ठलापूर-साखळी
कमलाकर देसाई : सरकारी प्राथमिक शाळा, गावठण-पिळये, धारबांदोडा
मंजिरी जोग : विशेष मुलांसाठी केशव सेवा साधना नारायण झांट्ये शाळा, सर्वण-डिचोली
राजमोहन शेट्ये : व्हायकाऊंट ऑफ पेडणे हायस्कूल, नानेरवाडा-पेडणे
कालिदास सातार्डेकर: पीएम श्री कामिलो परेरा मेमोरियल सरकारी हायस्कूल, सदर-फोंडा
ममता पाटील : श्रीमती आनंदीबाई महानंदू नाईक हायस्कूल, करंजाळ-मडकई गुरुदास पालकर, ज्ञानप्रसारक विद्यालय, म्हापसा
ऑरोरा डिसोझा : रोझरी हायस्कूल, नावेली
सुनील शेट : दीपविहार उच्च माध्यमिक, हेडलैंड-सडा
मुख्याध्यापक सिंथिया मारीया बॉर्जिस ई
अब्रांचिस : व्हीव्हीएमआरएमई उच्च माध्यमिक शाळा, कोंब-मडगाव