फ्लॅटात आग लागून दोन लाखाची मालमत्ता खाक
By पंकज शेट्ये | Updated: January 31, 2024 19:00 IST2024-01-31T19:00:26+5:302024-01-31T19:00:40+5:30
वास्को अग्निशामक दलाने घटनास्थळावर दाखल होऊन फ्लॅट मधील दोन घरगुती गॅस सिलिंण्डर त्वरित बाहेर काढून आग आटोक्यात आणल्याने पुढचा अनर्थ टळला.

फ्लॅटात आग लागून दोन लाखाची मालमत्ता खाक
वास्को: मंगळवारी (दि.३०) मध्यरात्रीनंतर वास्कोत असलेल्या साल्वीसन अपार्टमेंण्ट इमारतीच्या पहील्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागून आतील २ लाखाची सामग्री जळून खाक झाली. वास्को अग्निशामक दलाने घटनास्थळावर दाखल होऊन फ्लॅट मधील दोन घरगुती गॅस सिलिंण्डर त्वरित बाहेर काढून आग आटोक्यात आणल्याने पुढचा अनर्थ टळला. वास्को अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी दिलीप बिचोलकर यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार मंगळवारी मध्यरात्रीनंतर १२.४५ वाजता आगीची ती घटना घडली. साल्वीसन अपार्टमेंण्टच्या पहील्या मजल्यावर राहणाऱ्या लुइजा फर्नांडीस यांच्या घरात आग लागल्याची माहीती अग्निशामक दलाला मिळताच जवानांनी अग्निशामक बंबासहीत त्वरित घटनास्थळावर धाव घेतली.
आग फ्लॅटमधील एका खोलीत लागलेली असून जवळच असलेल्या स्वयंपाक खोलीत दोन घरगुती गॅस सिलिंण्डर असल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांना दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टीने जवानांनी दोन्ही गॅस सिलिंण्डर प्रथम फ्लॅटमधून बाहेर काढून ठेवले. त्यानंतर त्यांनी अथक परिश्रम घेत फ्लॅटमध्ये लागलेली आग आटोक्यात आणली. लुइजा फर्नांडीस यांच्या घरात आग कशामुळे लागली त्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. फ्लॅटच्या त्या खोलीत असलेल्या फ्रीज मध्ये शॉर्ट सरकीट होऊन आग लागली असावी असा अंदाज अग्निशामक दलाकडून व्यक्त केला जात आहे. लुइजा यांच्या फ्लॅटमध्ये आग लागून फ्रीज आणि इतर सामग्री जळून खाक झाल्याने दोन लाखाची नुकसानी झाल्याचा अंदाज अग्निशामक दलाकडून व्यक्त केला जात आहे.