झेडपीसाठी भाजपचे ८० टक्के नवे चेहरे; नावे निश्चित, घोषणा बाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:27 IST2025-11-14T07:24:11+5:302025-11-14T07:27:30+5:30
मगोला एक जागा शक्य

झेडपीसाठी भाजपचे ८० टक्के नवे चेहरे; नावे निश्चित, घोषणा बाकी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/म्हापसा : उत्तर गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांनी ८० टक्के नवे चेहरे रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. पक्षनिष्ठा, पक्षासाठी दिलेले योगदान हे विचारात घेऊन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना तिकिटावेळी प्राधान्य दिले जाईल. तरीही उत्तर गोव्यात ८० टक्के नवे चेहरे उमेदवार म्हणून भाजप देणार आहे. मांद्रे मतदारसंघातील झेडपीची एक जागा मगो पक्षासाठी सोडण्याची शक्यता आहे.
म्हापशात काल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद तानावडे, उपाध्यक्ष दत्ता खोलकर, मंत्री विश्वजीत राणे, आमदार प्रेमेंद्र शेट, माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्येकर, प्रेमानंद महांबरे, उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर आदींनी बैठकीत भाग घेतला. उत्तर गोव्यासाठी भाजपने उमेदवार तत्त्वतः ठरविले आहेत. फक्त अवघ्याच जागांबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे.
मंत्री, आमदारांचा कल कसा आहे, तेही पाहून उमेदवार निश्चित केले गेले आहेत. भाजपच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा जपली व अनेक वर्षे पक्षासाठी कष्ट घेतले, त्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटपावेळी प्राधान्य दिले जाईल. आता जे झेडपी सदस्य आहेत, त्यांच्यापैकी काहींचा पत्ता आरक्षणामुळे कट झाला. काहींना आता बदलले जाईल. त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना तिकीट दिले जाईल. कोणता उमेदवार जिंकू शकतो, त्याचा लोकसंपर्क कसा आहे, त्याने पक्षासाठी आतापर्यंत काय काम केले, त्याचे भाजपच्या स्थानिक आमदाराशी कसे नाते आहे, या सर्वाचा आढावा काल घेतला गेला आहे.
सकाळच्या सत्रात पेडणे, सत्तरी मतदारसंघातील उमेदवार व नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली. सायंकाळी बार्देश तालुक्यातील नेते व उमेदवारांशी चर्चा झाली. आज शुक्रवारी दक्षिण गोव्यातील उमेदवार ठरविण्यासाठी भाजपच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
ताळगावमध्ये बाबूशकडून रघुवीर कुंकळकर यांचे नाव जाहीर
महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ताळगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून माजी पंच रघुवीर कुंकळकर यांचे नाव जाहीर करत या चर्चेला पूर्णविराम दिला. यंदा हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातून बाबूश यांचे विश्वासू माजी सरपंच व माजी जि. पं. सदस्य जानू रोझारियो आणि माजी पंच रघुवीर कुंकळकर यांची नावे चर्चेत होती. जानू विद्यमान पंच असल्याने बाबूश यांनी रघुवीर यांच्या नावाचा विचार केल्याची चर्चा आहे.
भाजप-मगोची युती
दरम्यान, भाजप व मगोपची युती असल्याने मांद्रेतील एक जागा मगोसाठी सोडण्याचा भाजपचा विचार आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे मगोपचे आमदार जीत आरोलकर यांच्याशी बोलून घेतील, असे पक्ष सुत्रांनी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया राबवण्यात आली. इच्छुकांची नावे पक्षाकडे सादर करण्यात आली आहेत. अंतिम निर्णय निवड समिती घेईल. त्यानंतर उमेदवारी जाहीर होईल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.