५४ सफाई कामगारांना प्रत्येकी २० हजार रुपये; मंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:46 IST2025-10-03T12:45:48+5:302025-10-03T12:46:16+5:30
स्वत:च्या वेतनातून रक्कम देणार

५४ सफाई कामगारांना प्रत्येकी २० हजार रुपये; मंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'राज्यातील विविध पालिका क्षेत्रांतील एकूण ५४ सफाई कामगारांना प्रत्येकी वीस हजार रुपये आपण आपल्या वेतनातून देणार आहे,' असे नगर विकास खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी काल, बुधवारी जाहीर केले. आपण खात्याला तशी सूचना केली असल्याचे मंत्री राणे म्हणाले.
काल महात्मा गांधी जयंतीदिनी स्वच्छ भारत दिवसाचे राणे यांनी उद्घाटन केले. नगर विकास खाते व सुडा यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले होते. विविध पालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी आदींनी कार्यक्रमात भाग घेतला. आरोग्य सचिव यतिंद्र मरळकर, संचालक ब्रिजेश मणेरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
'राज्यात काही पालिका क्षेत्रांमध्ये स्वच्छतेचे काम चांगले चालते. स्वच्छता सफाई कामगारांमुळे चांगली होत असते व त्यामुळे त्यांची दखल घ्यायला हवी,' असे राणे म्हणाले. ते म्हणाले की, 'आमदार व मंत्री म्हणून मला जे वेतन मिळते, त्या वेतनाचा योग्य वापर व्हायला हवा हा माझा हेतू आहे. त्यामुळे निवडक पालिका क्षेत्रांतील ५४ कामगारांना आपल्या वेतनातून प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचे आपण आज जाहीर करतो.
मंत्री राणे म्हणाले की, 'राज्यातील सर्व पालिका क्षेत्रे ही हागणदारीमुक्त झाली आहेत. पणजी महापालिका क्षेत्राला कचरामुक्त शहर म्हणून मान्यता मिळाली आहे. पणजी शहराला यापूर्वी जल पुरवठा व कचरा व्यवस्थापनाविषयी पुरस्कारही मिळाला आहे.
आता स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सर्व १३ पालिका क्षेत्रांमध्ये १०० टक्के कचरा विलगीकरण होणे गरजेचे आहे. तेच आमचे लक्ष्य आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यावर प्रक्रिया व्हावी आणि कचऱ्यापासूनही संपत्तीची निर्मिती व्हावी,' असे राणे म्हणाले.