गोव्यातील ५ उत्पादनांना मिळाला 'जीआय' टॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:07 IST2026-01-02T10:07:23+5:302026-01-02T10:07:48+5:30
ताळगावची वांगी, हिलारियो आंबा, कोरगुट तांदूळ, गोवा काजू बोंड आणि मुसराद आंबा यांचा समावेश आहे.

गोव्यातील ५ उत्पादनांना मिळाला 'जीआय' टॅग
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यातील पारंपरिक कृषी उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली असून राज्यातील पाच उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक म्हणजेच जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये ताळगावची वांगी, हिलारियो आंबा, कोरगुट तांदूळ, गोवा काजू बोंड आणि मुसराद आंबा यांचा समावेश आहे.
या मान्यतेमुळे गोव्याच्या शेती परंपरेला, स्थानिक वैशिष्ट्यांना आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला अधिकृत ओळख मिळाली आहे. या निर्णयामुळे भविष्यात या उत्पादनांचे ब्रँडिंग मजबूत होणार असून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गोव्यातील कृषी उत्पादनांची ओळख अधिक भक्कम होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना ही बाब राज्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. 'गोव्याच्या मातीशी, हवामानाशी आणि परंपरेशी जोडलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळणे ही राज्याच्या कृषी सामर्थ्याची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. या जीआय टॅगमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि स्थानिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळण्यास मदत होईल' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गैरवापर रोखणार
जीआय टॅगमुळे या उत्पादनांची गुणवत्ता व वैशिष्ट्ये कायदेशीररीत्या संरक्षित राहणार असून त्यांच्या नावाचा गैरवापर रोखला जाणार आहे. राज्य सरकारकडून स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांतर्गत पारंपरिक आणि स्थानिक उत्पादनांचे जतन व मूल्यवर्धन करण्यावर विशेष भर दिला जात आहे. शेतकरी, उत्पादक संघटना आणि कृषी तज्ज्ञांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही मान्यता मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय ओळख
मिळालेली उत्पादने
ताळगावची वांगी
ताळगावची वांगी
हिलारियो आंबा
कोरगुट तांदूळ
गोवा काजू बोंड
मुसराद आंबा