४७० कोटींचा

By Admin | Updated: June 12, 2014 01:27 IST2014-06-12T01:13:06+5:302014-06-12T01:27:06+5:30

पणजी : पुंडलिकनगर-पर्वरी ते पणजीतील मडगाव-फोंडा सर्कलपर्यंत २.२ किलोमीटर लांबीचा नवा पूल ४७० कोटी खर्चून मांडवी नदीवर बांधला जाणार आहे.

470 crores | ४७० कोटींचा

४७० कोटींचा

पणजी : पुंडलिकनगर-पर्वरी ते पणजीतील मडगाव-फोंडा सर्कलपर्यंत २.२ किलोमीटर लांबीचा नवा पूल ४७० कोटी खर्चून मांडवी नदीवर बांधला जाणार आहे. या पुलाचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, पणजीतील वाहतुकीच्या कोंडीची समस्या यामुळे बरीच निकालात निघेल. मांडवी नदीवर सध्या असलेल्या दोन पुलांच्या मधून हा तिसरा नवा पूल येईल. तो दोन्ही पुलांच्या तुलनेत पंधरा मीटर उंचीवर असेल. पुलाचा मांडवी नदीवरील भाग ६00 मीटर लांबीचा असेल. नवा पूल चौपदरी असेल व त्यासाठी वन खाते, बंदर कप्तान, सीझेडएम आदी सर्व यंत्रणांची मान्यता मिळाली आहे. पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम दि. १५ सप्टेंबरपर्यंत सुरू होईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, पुंडलिकनगर सर्कलहून सुरू होणारा चौपदरी पूल मुंबईला जाणाऱ्या बसगाड्या जिथे थांबतात, त्या स्थानकापर्यंत येईल. त्यानंतर या पुलाची दिशा मडगावला जाणाऱ्या मार्गाच्या दिशेने नेली जाईल. मडगाव-फोंडा सर्कलला पुलाचा शेवट असेल. फोंड्याच्या दिशेने उड्डाणपूल बांधला जाईल. गुरुवार दि. १२ जूनपर्यंत कंत्राटदार कंपनीच्या हाती कामाचा आदेश दिला जाईल. नव्या पुलावर रंगीत विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुलाची पायाभरणी केली जाईल; पण हा कार्यक्रम सायंकाळी साडेचारच्या सुमारास कला अकादमीत होणार आहे. मांडवीच्या बाजूने कार्यक्रम करायला गेल्यास वाहतुकीची कोंडी होईल व सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण होईल. मांडवी पूल नेमका कसा असेल, याचे सादरीकरण त्या दिवशी कला अकादमीत लोकांना पाहायला मिळेल. मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीबाहेर येऊन गोव्यात प्रथमच कार्यक्रम करत आहेत. (खास प्रतिनिधी)

Web Title: 470 crores