विवेकानंद नगरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:14 IST2018-07-29T22:14:02+5:302018-07-29T22:14:29+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रविवारी दुपारी १ वाजता शहराच्या विवेकानंद वार्डातील वृध्दाश्रम परिसरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड.....

विवेकानंद नगरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रविवारी दुपारी १ वाजता शहराच्या विवेकानंद वार्डातील वृध्दाश्रम परिसरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड टाकून मोहफूल दारू, सडवा, कार व दारू गाळण्याचे साहित्य मिळून एकूण ४ लाख ८२ हजार ३२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी इम्रान खान युनूस खान पठाण (३१) व शेख रफीक अब्दुल कुरेशी रा. विवेकानंद नगर गडचिरोली या दोघांना अटक करून त्यांचेवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शेख रफीक अब्दुल कुरेशी यांच्या घरातून मोहफूल दारूने भरलेले ४१ लहान ड्रम, सडव्याने भरलेले दोन मोठे ड्रम व एक कार जप्त केली. २२ हजार रूपयांची मोहफूल दारू, १ लाख २२ हजार ५०० रूपये किमतीचा सडवा, ३ लाख रूपयांची कार तसेच तीन सिलिंडर व शेगळ्या आदी साहित्य जप्त केल्या. सदर कारवाई ठाणेदार गायकवाड, एपीआय उदार, गोनाडे, उराडे, बेसरकर, निर्मलवार, गौरवार, डोंगरे, गलगट, पातकमवार आदींनी केली. दारू विक्रेते आरोपी हे राहत्या घरात गॅसवर दारू गाळण्याचे काम करीत होते. पहाटेच्या सुमारास वाहनाने मोहफूल दारू इतरत्र पोहोचविली जात होती. दारू व सडव्याचा वास येऊ नये, यासाठी आरोपींनी साहित्याच्या ठिकाणी व परिसरात डांबरगोळ्या टाकल्या होत्या. या डांबरगोळ्या जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणेदारांनी दिली.
ठाकरी येथे ८६ हजार रूपयांची दारू जप्त
आष्टी : आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ठाकरी येथे पोलिसांनी रविवारी सकाळी ९ वाजता सापळा रचून वाहन व दारू जप्त केली. वाहनाची किंमत ५ लाख रूपये तर दारूची किंमत ८६ हजार ४०० रूपये आहे. सत्यवान नागुलवार (३२), संजय मंडल (३७) दोघेही रा. आष्टी व दुषांत कारपुरवार (२२) रा. ठाकरी या तिघांना अटक केली. सदर कारवाई आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दिलीप लुकळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नितेश गोहणे, विजय जगदाळे, संघरक्षित फुलझेले, प्रमोद मडावी, विनोद गौरकार, इंदल राठोड यांनी केली. तेलंगणा राज्यातून दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार रात्रभर मार्गावर पाळत ठेवली. रविवारी सकाळी १० वाजता शेतशिवारात वाहन उभे करून वाहनात दारू भरताना तिन्ही आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.