शासन कुठे झोपलंय? खतांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:32 IST2025-08-25T18:31:17+5:302025-08-25T18:32:29+5:30

सहा हजार टन खत आवश्यक : निंदनानंतर मागणी वाढणार, काळाबाजार होण्याची शक्यता

Where is the government sleeping? Farmers are being robbed in the name of fertilizers! | शासन कुठे झोपलंय? खतांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरूच!

Where is the government sleeping? Farmers are being robbed in the name of fertilizers!

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
धान रोवणीच्या कालावधीत संयुक्त खताचा तुटवडा होता. आता संयुक्त खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र युरियाचा तुटवडा निर्माण होणार आहे. कृषी विभागाने खताची मागणी केली आहे. खत वेळेवर उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांची मोठी पंचाईत होऊ शकते.


धान रोवणीच्या कालावधीत प्रामुख्याने संयुक्त खताचा वापर धान पिकासाठी केला जातो. धान पिकाच्या रोवणीनंतर जवळपास एक महिन्याच्या अंतराने रासायनिक खताचा दुसरा डोस देतात. यात काही शेतकरी संयुक्त खत तर काही शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया या दोन खताचे मिश्रण वापरतात. ही दोन्ही खते अतिशय स्वस्त आहेत; मात्र ही खते उपलब्ध न झाल्यास शेवटी संयुक्त खताचा वापर केला जातो. अशावेळी संयुक्त खतांची मागणी वाढून त्यांचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील १५ दिवसांमध्ये युरिया खत उपलब्ध होणे आवश्यक आहे.


कृषी विभागाचे प्रयत्न सुरू

  • चार दिवसांच्या कालावधीत एक हजार क्विंटल संयुक्त खत उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत १,२०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होईल.
  • युरिया खताची सध्या जिल्ह्यात आवश्यकता आहे. सप्टेंबर महिन्यात युरिया खताची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सदर खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे कृषी संचालक पुणे यांच्याकडे केली आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सातत्याने पाठपुरावा करीत आहे.


खताचा साठा किती
खत           साठा (टन)

युरिया          १,३२५
डीएपी           ३३३
एमओपी        ६१३
एसएसपी      २,१४०
एनपीके        २,१०८
एकूण           ६,५१९

निकृष्ट दर्जाच्या खताचा पुरवठा
यावर्षी हंगामाच्या अगदी सुरुवातीपासून रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. आजपर्यंत नाव न ऐकलेल्या कंपन्यांचे खत जिल्ह्यात विक्रीसाठी आले होते. अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव सदर खत खरेदी केले मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. कमी दर्जाचे खत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. खताचा अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने दुबार खत द्यावे लागले.


जिल्ह्यात सहा हजार टन युरिया आवश्यक
पोळ्याच्या नंतर निंदनाच्या कामाला वेग येणार आहे. निंदनाचे काम संपताच शेतकरी धान पिकाला युरिया देतात. हा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. जिल्ह्यात सध्या १,३२५ मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्याला पुन्हा सहा हजार मेट्रिक टन खताची गरज भासणार आहे.


शेतकऱ्यांची लूट
युरियाची शासकीय किंमत २६६.५० रुपये प्रतिबॅग एवढी आहे. या खतावर सरकारकडून मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जाते. त्यामुळे हे खत स्वस्त आहे तसेच गरीब शेतकरी या खताचा वापर करतात. तसेच नियमानुसार सरकारने ठरवून दिलेल्या किमतीच्या एकही रुपया अधिकचा घेता येत नाही; मात्र खत विक्रेते या खताची टंचाई लक्षात घेऊन ३५० ते ४०० रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करतात.

Web Title: Where is the government sleeping? Farmers are being robbed in the name of fertilizers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.