'आम्ही ७१ लाखांचा 'जीएसटी' दिला पण.. ' 'सीए'ने भरलाच नाही; कसे फसवले ग्राहकांना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:03 IST2025-10-09T18:02:47+5:302025-10-09T18:03:54+5:30
गडचिरोलीत प्रकार उघडकीस : अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय

'We paid GST of 71 lakhs but..' 'CA' did not pay; How did they cheat customers?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कंत्राटदार कंपनीच्या प्राप्तिकर व जीएसटी कर भरण्याची विश्वासाने जबाबदारी दिल्यानंतर एका सनदी लेखापालाने (सीए) २०१८ ते २०२५ या कालावधीत तब्बल ७१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ७ ऑक्टोबरला शहरात उघडकीस आला.
याबाबत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, अविनाश नरेंद्र भोयर (रा. म्हाडा कॉलनी, गडचिरोली) असे त्या सनदी लेखापालाचे नाव आहे. सुनील मुरलीधर बट्टूवार (रा. कन्नमवार वॉर्ड, बालाजी नगर, गडचिरोली) हे कंत्राटदार असून पत्नी वैशाली यांच्या नावे मे. बालाजी इन्फ्रा नावाचे फर्म आहे. या माध्यमातून ते महावितरणमध्ये कंत्राट घेऊन कामे करतात. त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल एक कोटीहून अधिक रुपयांची आहे. त्यामुळे त्यांनी प्राप्तिकर व जीएसटीचा कर भरणा करण्याची जबाबदारी २०१८ पासून सनदी लेखापाल अविनाश भोयर याच्यावर सोपविली.
२२ जानेवारी २०१८ ते ३० ऑगस्ट २०२५ या दरम्यान बट्टवार यांनी जीएसटी कराच्या स्वरूपात भौयर यास तब्बल ७२ लाख ३० हजार ४३१ रुपये एवढी रक्कम दिली. मात्र, भोयर याने ही रक्कम जमा न करता अपहार केला.
कसून चौकशी सुरू
सीए अविनाश भोयर याने जीएसटी रकमेवर डल्ला मारून आणखी काही बड्या कंत्राटदारांसह व्यापाऱ्यांना फसविले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याअनुषंगाने त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पो. नि. विनोद चव्हाण यांनी सांगितले. फसवणूक झालेल्यांनी समोर यावे व पुराव्यासह तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जीएसटी क्रमांक रद्दच्या नोटीसने भंडाफोड
दरम्यान, अविनाश भोयर याने जीएसटी वेबसाइटला बहूवार यांच्या फर्मसमोर स्वतःचा ई-मेल आयडी व स्वतःचाच मोबाइल क्रमांक नोंदविला होता. त्यामुळे थकीत जीएसटीबाबत फर्मला वेळोवेळी निघालेल्या नोटीस बट्टवार यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. जीएसटी क्रमांक रद्द करण्याबाबतची अंतिम नोटीस बडूवार यांच्या पत्त्यावर आली. त्यानंतर बडूवार यांनी जीएसटी कार्यालयात जाऊन खातरजमा केली.
जीएसटीच्या बनावट पावत्या देऊन घूमजाव
- जीएसटी क्रमांक रद्द करण्याबाबत अंतिम नोटीस आल्यावर सुनील बट्टवार यांनी अविनाश भोयरकडे विचारणा केली असता त्याने जीएसटी विभागाने चुकून नोटीस थाडली असावी, असे सांगितले.
- त्यानंतर जीएसटीच्या बनावट इलेक्ट्रॉनिक आकडे असलेल्या पावत्या बनवून त्या बडूवार यांना दिल्या. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
- त्यावरून भारतीय न्याय संहिता ३ (बीएनएस) ३१६ (५), ३३६ (४), ३३८, ३४० (२) अन्वये गुन्हा नोंदविला.