दोन केबलधारकांनी करमणूक कर बुडविला
By Admin | Updated: April 3, 2017 02:18 IST2017-04-03T02:18:08+5:302017-04-03T02:18:08+5:30
केबलधारकांना दरवर्षी प्रशासनाकडे करमणूक कर भरावा लागतो. मात्र देसाईगंज शहरातील दोन केबलधारकांनी

दोन केबलधारकांनी करमणूक कर बुडविला
तपासणीत आढळल्या अधिक जोडण्या
देसाईगंज : केबलधारकांना दरवर्षी प्रशासनाकडे करमणूक कर भरावा लागतो. मात्र देसाईगंज शहरातील दोन केबलधारकांनी करमणूक कर बुडविल्याची बाब उघडकीस आली आहे. कारण त्यांच्याकडे निरिक्षणानंतर केबल जोडणीची संख्या अधिक दिसून आली.
येथील एका केबलधारकाकडे निरिक्षणापूर्वी २५१ जोडण्या होत्या. निरिक्षणानंतर २९३ केबल जोडण्या दिसून आल्या. संबंधित केबलधारकाकडे ४२ वाढीव जोडण्या निरिक्षणानंतर आढळून आल्या. तर दुसऱ्या एका केबलधारकाकडे निरिक्षणापूर्वी १०५ जोडण्या होत्या. निरिक्षणानंतर १२३ जोडण्या दिसून आल्या. विशेष म्हणजे, या केबलधारकाकडे ७८ जोडण्या अधिकच्या दिसून आल्या. मुंबई करमणूक कर अधिनियम १९२३ चे कलम ३ (४) अन्वये अटी व शर्तीचे तसेच प्रशासकीय आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित केबलधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. महाराष्ट्र करमणूक कर अधिनियम १९२३ च्या कलम ५ अन्वये सुधारीत राजपत्र २५ जून २०११ च्या कलम ४ नुसार ५० अथवा महसूल हानीच्या १० पट यापैकी जे जास्त असेल अशा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र देसाईगंजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी अधिक केबल जोडण्या आढळून आलेल्या संबंधित केबलधारकांकडून अत्यल्प दंडाची कारवाई केल्याचा आरोप अमित नंदलाल देवानी यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, देसाईगंजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी एका केबलधारकाकडून अत्यल्प दंड वसूल केला आहे. त्यामुळे शासनाचा ४७ हजार रूपयांचा महसूल बुडाला आहे. मुंबई करमणूक कर १९२३ च्या अधिनियमानुसार महसूल हानीच्या १० पट अथवा ५० हजार रूपये यापैकी जी जास्त असेल ती रक्कम वसूल करण्याचे शासनाचे नियम आहे. मात्र शासन आदेश धुडकावले आहेत, त्यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)