शेततळ्यात बुडून दाेन मावसभावांचा मृत्यू; शिरपूर येथील घटना

By दिगांबर जवादे | Updated: July 6, 2025 19:51 IST2025-07-06T19:51:46+5:302025-07-06T19:51:57+5:30

अंघाेळीचा बेत उठला जीवावर

Two brothers drown in a farm pond; Incident in Shirpur | शेततळ्यात बुडून दाेन मावसभावांचा मृत्यू; शिरपूर येथील घटना

शेततळ्यात बुडून दाेन मावसभावांचा मृत्यू; शिरपूर येथील घटना

गडचिराेली : अंघाेळीसाठी शेततळ्यात उतरलेल्या दाेन मावसभावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे घडली. विहान ज्ञानेश्वर मडावी (१२, रा. शिरपूर) व हृदय ज्ञानेश्वर मडावी (११, रा. गडचिराेली), अशी मृतक बालकांची नावे आहेत.

हृदय मावशीकडे शिरपूर येथे आला हाेता. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने विहान व हृदय या दाेघांनीही शेततळ्यात अंघाेळ करण्याचा बेत आखला. घरच्यांना न सांगताच ते सायकलने गावाशेजारी असलेल्या नाजूक मडावी यांच्या शेततळ्यावर गेले. शेततळ्याच्या पाळीवर सायकल, कपडे व चपला काढून ठेवल्या व शेततळ्यात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. तसेच दाेघांनाही पाेहता येत नव्हते, त्यामुळे दाेघेही पाण्यात बुडाले.

गावातील नागरिकांना शेततळ्याच्या पाळीवर कपडे व चप्पल दिसून आल्या; मात्र मुले आढळून आली नाही. मुले शेततळ्यात उतरल्याचे पायाचे ठसे दिसून आले. त्यामुळे ते पाण्यात बुडाले असल्याचा संशय पक्का झाला. याबाबतची माहिती पोलिस पाटील विश्वनाथ रामटेके यांना दिली. दाेघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. विहान मडावी यांचे वडील शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथे शिक्षक आहेत. तर हृदयचे वडील पाेलिस दलात आहेत. विशेष म्हणजे, दाेघांच्याही वडिलांचे नाव ज्ञानेश्वर आहे.

परिसरात शाेककळा

रविवार हा आषाढी एकादशीचा दिवस. गावात धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन केले हाेते. मात्र, अचानक दाेन्ही बालके बुडाल्याची माहिती गावात पसरली. त्यामुळे गावावर शाेककळा पसरली

Web Title: Two brothers drown in a farm pond; Incident in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.