अव्वल कारकुनाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:10 IST2018-08-26T00:07:38+5:302018-08-26T00:10:29+5:30
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून खोट्या सह्यानिशी जमिनींचे व्यवहार केल्याप्रकरणी अव्वल कारकून दुष्यंत कोवे याला शनिवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात झालेली ही दुसरी तर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची पहिलीच अटक आहे.

अव्वल कारकुनाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून खोट्या सह्यानिशी जमिनींचे व्यवहार केल्याप्रकरणी अव्वल कारकून दुष्यंत कोवे याला शनिवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात झालेली ही दुसरी तर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची पहिलीच अटक आहे. यापूर्वी ३ जुलै रोजी सिरोंच्या तहसील कार्यालयातील लिपीक मल्लय्या कासेट्टी याला अटक झाली होती.
सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा येथील जमिनी बनावट शिक्क्यांचा वापर करून भोगवटदार वर्ग २ ची जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये परावर्तित करण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून दुष्यंत कोवे पोलीस कारवाई होण्यापूर्वीच फरार झाला. त्याने जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला होता. परंतु दोन्ही न्यायालयाने अपील खारीज केल्याने सिरोंचा पोलीस विभागाने फरार दुष्यंत कोवेला पकडण्यासाठी सापळा रचला आणि शनिवारी (दि.२५) सिरोंचा बस स्थानकावर त्याला अटक करण्यात आली.
कोवे याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने नाकारल्यानंतर तो तेलंगणा राज्यात जाणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सापळा रचला व त्याला अटक केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास चालू असून यासाठी अप्पर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे यांच्या नेतृत्वात एक टीम तयार केली आहे.
आता तपासाला येणार गती
हे प्रकरण उघडकीस येण्याच्या दोन दिवसांपूर्वीच दुष्यंत कोवे याची अहेरी येथून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती. मात्र बनावट जमीन व्यवहार प्रकरण उघडकीस आल्याचे कळताच तो जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून फरार झाला होता. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात तपासाला वेग येणार आहे. सिरोंचा परिसरातील जमिनीचे व्यवहार करणारी काही मंडळी तसेच महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.