थरारक ! घरच्यांचा विरोध पत्करून केला प्रेमविवाह; दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:26 IST2026-01-23T13:25:33+5:302026-01-23T13:26:41+5:30

Gadchiroli : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा पेट्रोल टाकून, जाळून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पोर्ला येथे २२ जानेवारी रोजी उघडकीस आली.

Thrilling! Love marriage despite family opposition; Wife burnt alive for not paying for liquor | थरारक ! घरच्यांचा विरोध पत्करून केला प्रेमविवाह; दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळले

Thrilling! Love marriage despite family opposition; Wife burnt alive for not paying for liquor

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा पेट्रोल टाकून, जाळून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पोर्ला येथे २२ जानेवारी रोजी उघडकीस आली. नातेवाईकांचा विरोध पत्करून तसेच रुढी-परंपरेची बंधने तोडून ज्याच्याशी लग्नाची रेशीमगाठ बांधली, तो पतीच तिच्यासाठी काळ ठरला. एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पत्नीचा उपचारादरम्यान नागपूरमध्ये मृत्यू झाला. सात जन्म सोबत निभावण्याच्या आणाभाका सात वर्षांतच तुटल्या आणि हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. त्यांच्या दोन चिमुकल्या आई-वडिलांच्या प्रेमाला पारख्या झाल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियांका सुशील बारसागडे (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे माहेर चंद्रपूर जिल्ह्यातील निलसनी पेडगाव (ता. सावली) हे आहे. २०१८ मध्ये प्रियांका व सुशील यांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला होता. सुशील मोलमजुरीचे काम करायचा. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्याला दारूचे व्यसन जडल्याने घरात वाद होऊ लागला. १६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५ च्या सुमारास सुशीलने दारू पिण्यासाठी प्रियांकाकडे पैशांची मागणी केली. प्रियांकाने विरोध करताच त्याने तिला बेदम मारहाण केली आणि कपाटातील २००० रुपये हिसकावून नेले.

तो काही वेळाने पुन्हा घरी परतला. यावेळी प्रियांका स्वयंपाकघरात काम करत होती. सुडाने पेटलेल्या सुशीलने मागून येऊन प्रियांकाच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि काडी लावून तिला पेटवून दिले. प्रियांकाने जीवाच्या आकांताने आक्रोश केल्याने तिची मोठी मुलगी सुप्रिया (वय ५) हिने मोठ्याने रडण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून शेजारी धावून आले, तोपर्यंत ती ४० ते ५० टक्के भाजली होती.

आरोपीने स्वतःच तिच्या अंगावर चादर टाकून आग विझविण्याचा बनाव केला, प्रियांकाला सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, नंतर नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले, प्रकृती खालावल्याने खासगी दवाखान्यात हलविले. मात्र, २० जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. उपचार सुरु असताना वडील अशोक बोलदवार यांच्याकडे तिने घटनाक्रम सांगितला, वडिलांच्या फिर्यादीवरून गडचिरोली ठाण्यात सुशील चिंटुजी बारसागडे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

इकडे पतीला अटक, तिकडे पत्नीवर अंत्यसंस्कार

  • २१ जानेवारी रोजी मृत प्रियांकावर माहेरी निलसनी पेडगाव (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथे अंत्यसंस्कार पार पडले, त्याचवेळी पोर्ला गावातून पती सुशील बारसागडे यास गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • अंत्यसस्कारावेळी प्रियांकाचे आई-वडील व दोन विवाहित बहिणी शोकमग्न झाल्या होत्या. सुशील बारसागडे यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पो.नि. विनोद चव्हाण यांनी दिली.

 

मोठी लेक आजोळी, धाकटी दवाखान्यात !

  • मृत प्रियांकाला पाच वर्षांची सुप्रिया व अवघ्या तीन महिन्यांची सुहानी या दोन मुली आहेत. वडिलांनी आईला संपविले. आता आईच्या हत्येच्या आरोपाखाली वडील तुरुंगात गेले.
  • सुशील बारसागडे यास आई-वडील नाहीत. प्रियांकाचे आई-वडील वयोमानाने थकलेले आहेत. त्यामुळे दोन लेकी जन्मदात्यांच्या प्रेमाला पोरक्या झाल्या असून, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • सध्या मोठी मुलगी सुप्रिया ही आजोळी असून, तीन महिन्यांची सुहानी जिल्हा रुग्णालयातील शिशुगृहात उपचार घेत आहे.

Web Title : प्रेम विवाह के बाद पति ने शराब के लिए पत्नी को जलाकर मारा।

Web Summary : गढ़चिरोली में, एक आदमी ने शराब के लिए पैसे न देने पर अपनी पत्नी को जलाकर मार डाला। दंपति ने परिवार की इच्छा के खिलाफ प्रेम विवाह किया था। एक महीने बाद पीड़िता ने दम तोड़ दिया, और दो छोटी बेटियां पीछे छूट गईं।

Web Title : Man Kills Wife for Alcohol Money After Love Marriage.

Web Summary : In Gadchiroli, a man murdered his wife by setting her ablaze after she refused to give him money for alcohol. The couple had a love marriage against family wishes. The victim succumbed to her injuries after a month, leaving behind two young daughters.