अबुझमाडच्या जंगलातील चकमकीत एकूण तीन माओवाद्यांना कंठस्नान, एका जवानाला वीरमरण, धुमश्चक्री सुरूच
By संजय तिपाले | Updated: February 6, 2026 10:12 IST2026-02-06T10:09:06+5:302026-02-06T10:12:22+5:30
Gadchiroli News: ३ फेब्रुवारीपासून भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या या मोहिमेत ६ रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एका महिला माओवाद्यासह एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला. आतापर्यंत एकूण ३ माओवादी ठार झाले आहेत.

अबुझमाडच्या जंगलातील चकमकीत एकूण तीन माओवाद्यांना कंठस्नान, एका जवानाला वीरमरण, धुमश्चक्री सुरूच
गडचिरोली - छत्तीसगडच्या सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडोंनी ५ फेब्रुवारी रोजी एका माओवद्याला ठार केले होते, तर एक जवान जखमी झाला होता. घटनास्थळी आणखी दोन माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. मात्र, या कारवाईत जखमी झालेले जवान दीपक चिन्ना मडावी (३८, रा. दामरंचा ता.अहेरी, ह. मु. अहेरी) यांना वीरमरण आले आहे.
३ फेब्रुवारीपासून भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या या मोहिमेत ६ रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एका महिला माओवाद्यासह एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला. आतापर्यंत एकूण ३ माओवादी ठार झाले असून, त्यांच्याकडून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. मारल्या गेलेल्या माओवाद्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.
जवान दीपक मडावींना वीरमरण
या चकमकीत जखमी झालेले सी-६० जवान दीपक चिन्ना मडावी (३८, रा. अहेरी) यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
आणखी एक जवान जखमी; प्रकृती स्थिर
याच मोहिमेदरम्यान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हे जवान देखील गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ हेलिकॉप्टरने बाहेर काढून भामरागड येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथे हलवण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अबुझमाडचा परिसर अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलाचा आहे. या भागात अजूनही माओवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली