'त्यांनी' दहशत दाखविण्यासाठी स्मारके उभारली.. जवानांनी नायनाट करून तिथेच केले वृक्षारोपण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:30 IST2025-10-03T13:27:45+5:302025-10-03T13:30:21+5:30
गडचिरोली पोलिसांची कारवाई; वृक्षारोपण करून शांततेचा संदेश : कटेझरीत केली माओवाद्यांची दोन स्मारके उद्ध्वस्त

'They' built monuments to show terror.. The soldiers destroyed them and planted trees there.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम अतिदुर्गम भागात दहशत निर्माण करून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून स्मारकांची उभारणी केली जाते. मात्र, गडचिरोली पोलिसांनी माओवादी कारवायांवर घणाघाती प्रहार केला असून पो.स्टे. कटेझरी हद्दीत मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी दोन ते तीन वर्षांपूर्वी उभारलेली दोन स्मारके पोलिसांनी उद्ध्वस्त केली.
३० सप्टेंबर रोजी कटेझरी पोलिस ठाण्याचे पथक व एसआरपीएफचे जवान जंगल परिसरात शोधमोहीम राबवीत असताना ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद ठिकाणी बीडीडीएस पथकाने तपासणी करून ही स्मारके पाडण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांच्याही मदतीने स्मारकांचा नायनाट करून त्याठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.
पोलिसांनी उपस्थित गावकऱ्यांना आवाहन केले की, माओवाद्यांच्या खोटचा भूलथापांना बळी न पडता पोलिसांना सहकार्य करून गावाचा विकास साधावा. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, गडचिरोली पोलिस दल माओवाद्यांच्या दहशतीपासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे. समाजात माओवादी स्मारकांना कुठेच स्थान नाही. त्यामुळे अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये कोणीही सहभागी होऊ नये.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, अधीक्षक गोकुल राज जी., तसेच सहायक अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी कटेझरी ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक अजय भोसले, एसआरपीएफ गट ११ चे उपनिरीक्षक कुणाल भारती व जवान सहभागी होते.