रोपवाटिकेतच वनकर्मचारी तर्रर्र... दोघांना निलंबनाचा दणका
By संजय तिपाले | Updated: July 13, 2023 14:47 IST2023-07-13T14:40:22+5:302023-07-13T14:47:53+5:30
बेडगाव वनपरिक्षेत्रातील प्रकार: मद्यधुंद अवस्थेतील फोटो व्हायरल

रोपवाटिकेतच वनकर्मचारी तर्रर्र... दोघांना निलंबनाचा दणका
गडचिरोली : दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात वनकर्मचारीच तर्रर्र असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे कर्तव्यावरच रोपवाटिकेत त्यांनी मद्यपान केल्याचे उघड झाले. त्यानंतर उपवनसंरक्षकांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले. १२ जूनला बेडगाव (ता.कोरची) वनपरिक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अजय गहाणे व बबलू वाघाडे अशी त्या कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. गहाणे हा क्षेत्रसहायक आहे तर वाघाडे वनरक्षक म्हणून काम करतो. बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत मोहगाव रोपवाटिकेत ते दोघे ऑन ड्युटी तर्रर्र होते. रोपवाटिकेत रोपे नेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्याची माहिती आहे. त्यानंतर नागरिकांनीच त्याचे मोबाइलमध्ये चित्रण करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना धाडले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात तथ्य आढळल्याने अखेर उपवनसंरक्ष धर्मवीर सालविठ्ठल यांनी १२ जुलै रोजी त्या दोघांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
दरम्यान, रोपवाटिकेत अनेक दिवसांपासून हा गैरप्रकार सुरु असल्याचा अंदाज आहे. मात्र, एके दिवशी दोन्ही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळले, त्यानंतर अखेर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामुळे बेशिस्त कर्मचाऱ्यांनाही योग्य तो संदेश गेला आहे.