नक्षलवादाचा शेवट आला जवळ! जहाल कमांडर पापा राव अखेर शरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 07:30 IST2026-03-25T07:30:42+5:302026-03-25T07:30:42+5:30
एकेकाळी नक्षली चळवळीचा पोलादी कणा मानला जाणारा ५६ वर्षीय पापा राव आता लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील झाला

नक्षलवादाचा शेवट आला जवळ! जहाल कमांडर पापा राव अखेर शरण
लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली : गेल्या अनेक दशकांपासून दंडकारण्याच्या घनदाट जंगलात समांतर सत्ता राबवणारा आणि सुरक्षा दलांच्या नाकीनऊ आणणारा जहाल नक्षल कमांडर सुन्नम पापा राव आणि ओडीशाचा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी सुकरू उर्फ कोशा सोढी या दोघांनी अखेर मंगळवारी सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
एकेकाळी नक्षली चळवळीचा पोलादी कणा मानला जाणारा ५६ वर्षीय पापा राव आता लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील झाला असून, यामुळे बस्तरमधील नक्षली साम्राज्याचा शेवटचा बुरूज ढासळल्याचे मानले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२६ च्या सुरुवातीलाच बस्तर नक्षलमुक्त करण्याची ‘डेडलाइन’ निश्चित केली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी ‘अंतिम प्रहार’ मोहीम तीव्र केली होती. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी पापा रावच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. प्रशासनाने दिलेला इशारा, कुटुंबाने घातलेली साद यामुळे त्याचे हृदयपरिवर्तन झाले असून त्याने एके-४७ सह आत्मसमर्पण केले.
आतापर्यंत १७ बड्या नेत्यांचा खात्मा
गेल्या वर्षभरात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांची मोठी फळी उद्ध्वस्त केली आहे. जहाल माओवादी माडवी हिडमा, सचिव बसवाराजू आणि गणेश उइके यांच्यासह १७ बड्या नेत्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दुसरीकडे भूपती, रूपेश आणि रामधेर यासारख्या नेत्यांनी शेकडो साथीदारांसह शस्त्रे खाली ठेवली आहेत. नक्षलवाद्यांचा ‘एमएमसी’ (मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड) झोन आता पूर्णपणे साफ झाला आहे. वर्षभरात ७०० माओवाद्यांनी शस्त्रे ठेवली आहेत.
उरले ‘हे’ दोनच मोठे चेहरे...
मुपल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती : (३.५ कोटींचे इनाम) - नक्षलवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार.
मिशिर बेसरा ऊर्फ भास्कर : (१.३० कोटींचे इनाम)- सापळा (अँब्युश) लावण्यात माहीर.