शिक्षकांची प्रकरणे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:02 IST2018-01-15T23:01:59+5:302018-01-15T23:02:25+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून शिक्षकांना न्याय द्यावा, ....

शिक्षकांची प्रकरणे प्रलंबित
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन सादर करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात, सेवा नियमित व स्थायी प्रकरणे निकाली काढणे, शिक्षकांना आदेश देऊन सेवा पुस्तकात नोंद घेणे, शैक्षणिक कामासाठी अर्जित रजा मंजूर करणे, चटोपाध्याय वेतन श्रेणी लावताना पूर्वीच्या शिक्षकांना ‘अ’ श्रेणीची अट न ठेवणे, अवघड/सर्वसाधारण गावांच्या यादीची पुनर्रचना करणे, २०१४ मधील स्वच्छता गृह बांधकामाचा दुसरा हप्ता मिळणे, पोषण आहार तांदूळ आणि धान्य पुरवठा चालू सत्रातील पटसंख्येनुसार वितरित करणे, इंधन व भाजीपाला खर्च अदा करणे, मुलींचा दैैनंदिन उपस्थिती भत्ता त्वरित देणे, विशेष म्हणजे भामरागड केंद्रातील विद्यार्थिनींचा २००७ पासून उपस्थिती भत्ता प्रलंबित आहे. संपूर्ण शिष्यवृत्तींची रक्कम अदा करणे, जि. प. शाळांतील विद्युत देयके जि. प. स्तरावरून अदा करणे, शिक्षकांचे वेतन १ तारखेला अदा करणे आदी मागण्यांचा समावेश होता. सदर मागण्यांचे निवेदन जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना सुपूर्द करण्यात आले. या संदर्भात जि. प. अध्यक्ष, शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र डोहणे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, सरचिटणीस प्रभाकर साखरे, धानोरा तालुकाध्यक्ष दीपक भैसारे, गडचिरोली तालुकाध्यक्ष राजेश खेवले, सरचिटणीस महेंद्र कोडापे, सुरेश धुळसे, नरेंद्र सहारे उपस्थित होते.