हिंसेचा मार्ग सोडून केले होते आत्मसमर्पण.. नवजीवनाची सुरवात केल्याने 'सम्मी'- 'अर्जुन'ला आज पुत्ररत्न
By संजय तिपाले | Updated: November 21, 2025 20:28 IST2025-11-21T20:27:42+5:302025-11-21T20:28:49+5:30
नवजीवनाची पहाट : जिल्हा महिला रुग्णालयात प्रसूती, माता - बाळ सुरक्षित

Surrendered after abandoning the path of violence.. Starting a new life, 'Sammi' and 'Arjun' are blessed with a son today
गडचिरोली : घनदाट जंगलातील हिंसेचा रक्तरंजित मार्ग मागे टाकून शांततेच्या प्रवाहात दाखल झालेल्या माओवादी दाम्पत्याच्या आयुष्यात २१ नोव्हेंबर रोजी नवा पाहुणा दाखल झाला. आत्मसमर्पण करून नवजीवनाची सुरुवात केलेल्या अर्जुन ऊर्फ सागर हिचामी आणि त्याची पत्नी सम्मी ऊर्फ बंडी मट्टामी यांना जिल्हा महिला रुग्णालयात पुत्ररत्न प्राप्त झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १ जानेवारी २०२५ रोजी या दाम्पत्याने १२ माओवादी सदस्यांसह आत्मसमर्पण केले होते. डीव्हीसीएम व एसीएम स्तरावर कार्यरत असलेल्या या दोघांना दलममध्ये असताना कौटुंबीक जीवन जगणेही अशक्य होते,पण आत्मसमर्पणानंतर गडचिरोली पोलिस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’मुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची नवी वाट खुली झाली.
अर्जुन व सम्मी या दाम्पत्याला पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून १६.३ लाखांचा निधी, आधार–पॅन कार्ड, बँक खाते, इ-श्रम कार्ड ते ड्रायव्हिंग लायसन्सपर्यंत सर्व सुविधा मिळाल्या. समाजाच्या मुख्य प्रवाहाशी त्यांची नाळ पुन्हा जुळावी यासाठी पोलिस दलाने प्रयत्न केले. सम्मीच्या प्रसूतीनंतर पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याने या दाम्पत्याच्या नव्या जीवनाला खरी उभारी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या दाम्पत्याला शुभेच्छा देत प्रकृतीची विचारपूस देखील केली.
१०१ जणांनी चालू वर्षी सोडली शस्त्रे
सन २००५ पासून आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोलीत आजवर ७८३ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण करून शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. यावर्षीच १०१ जणांनी शस्त्र सोडून संविधान हाती घेतले. यामुळे त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान व स्थैर्य येण्यास सुरुवात झाली आहे.
"गडचिरोली पोलिस दलाच्या प्रोजेक्ट संजिवनीच्या माध्यमातून आरोग्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण, रोजगार इत्यादी विविध सुविधा आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना दिल्या जातात. त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनाची जबाबदारी पोलिस दलाकडून घेतली जाते, त्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक