सूरजागड यात्रा दारू व तंबाखूमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:47+5:302021-01-08T05:58:47+5:30

एटापल्ली : तालुक्यातील सूरजागड येथे ५ जानेवारीपासून ठाकूरदेव यात्रा भरणार आहे. आदिवासी समाजात या यात्रेला फार महत्त्व आहे. जिल्ह्यातीलच ...

Surjagad Yatra will be alcohol and tobacco free | सूरजागड यात्रा दारू व तंबाखूमुक्त करणार

सूरजागड यात्रा दारू व तंबाखूमुक्त करणार

एटापल्ली : तालुक्यातील सूरजागड येथे ५ जानेवारीपासून ठाकूरदेव यात्रा भरणार आहे. आदिवासी समाजात या यात्रेला फार महत्त्व आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर लागूनच असलेल्या बस्तर भागातील आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने यात्रेसाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी देवस्थान समिती, स्थानिक जनता व मुक्तिपथ संयुक्तरित्या प्रयत्न करणार आहे.

सूरजागड येथील देवस्थानात तीन दिवस ठाकूर देवाची यात्रा भरली जाते. ठाकूरदेवाचे मंदिर आदिवासींचे दैवत आहे. सूरजागड पट्टी परिसरातील ४० गावातील प्रमुख, भूमिया, पुजारी, पोलीसपाटील, सरपंच हे सर्व गावापासून ५ किमी अंतर पायी पहाडी चढून ठाकूरदेवाची पूजाअर्चा करतात. या ठिकाणी अद्यापही मातीचे तुटलेले घोडे व काही मूर्ती कायम आहेत. आदिवासींसोबत बिगर आदिवासी लोकही या पहाडीवर उत्साहापोटी चढतात. या पहाडीवरून दिसणारे दृश्य मनमोहक आहे. त्यामुळे यात्रेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. धार्मिक ठिकाणी कुणीही दारू किंवा खर्रा सेवन करून येऊ नये, यासाठी सूरजागड येथील यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी देवस्थान समिती व परिसरातील जनतेच्या सहकार्याने मुक्तिपथ अभियानातर्फे सलग तीन दिवस जनजागृती करण्यात येणार आहे. यात्रेच्या ठिकाणी बॅनर तसेच व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून दारू व खर्रा सेवनाचे दुष्परिणाम सांगत सुव्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बैठकीला सूरजागड पारंपरिक गाेटूल समितीचे अध्यक्ष सैनू गाेटा यांच्यासह इलाक्यातील सदस्य व मुक्तिपथ कार्यकर्ते उपस्थित हाेते.

बाॅक्स ..........

गाेटूल समिती ठाेठावणार दंड

विदर्भात प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा यात्रा, चपराळा यात्रा दारू व तंबाखूमुक्त भरत आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांचे महत्त्वाचे स्थान असलेले सूरजागड येथील ठाकूरदेव यात्रादेखील शांततेत पार पाडण्यासाठी खर्रा व दारूमुक्त करण्यात येणार आहे. परिसरातील सर्वच गावे आदिवासीबहुल असल्याने गावठी दारू मोठ्या प्रमाणात गाळली जाते. काहीजण दारूची विक्रीदेखील करतात. अशा विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी व कुणीही दारू पिऊन यात्रेचे पावित्र्य भंग करू नये, यासाठी दारूमुक्त यात्रा होणे गरजेचे आहे. यासंदर्भात ठराव घेण्यात आला असून, स्वयंसेवकांची निवडसुद्धा करण्यात आली आहे. नियम न पाळता खर्रा व दारुविक्री करणाऱ्यांवर गाेटूल समितीतर्फे दंड ठाेठावला जाणार आहे.

Web Title: Surjagad Yatra will be alcohol and tobacco free