'आयबीएम'च्या मूल्यांकनात सुरजागड लोहखाणीचा दबदबा; ५-स्टार रेटिंग मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:24 IST2025-07-09T16:22:00+5:302025-07-09T16:24:07+5:30

गडचिरोलीचे नाव उंचावले: ५-स्टार रेटिंग, जी. किशन रेडींच्या हस्ते सन्मान

Surjagad Iron Ore Mine dominates in 'IBM' assessment; District's name elevated by getting 5-star rating | 'आयबीएम'च्या मूल्यांकनात सुरजागड लोहखाणीचा दबदबा; ५-स्टार रेटिंग मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले

Surjagad Iron Ore Mine dominates in 'IBM' assessment; District's name elevated by getting 5-star rating

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या लोहखनिज खाणीने केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (आयबीएम) कडून प्रतिष्ठित ५-स्टार रेटिंग मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. ७ जुलै रोजी जयपूर येथील राजस्थान आंतरराष्ट्रीय केंद्रातील समारंभात केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते सन्मान झाला.


२०२३-२४ या वर्षात कार्यचालनातील उत्कृष्टता आणि हरित नवोपक्रमात अत्युत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुरजागड खाणीला हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे, भारतीय खाण ब्युरोचे प्रभारी महानियंत्रक पीयूष नारायण शर्मा, 'आयबीएम'चे मुख्य खाण नियंत्रक पंकज कुलश्रेष्ठ यांच्या उपस्थितीत एलएमईएलच्या अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला.


केंद्रीय खाण मंत्रालयाने शाश्वत विकास मार्गदर्शक तत्त्व (एसडीएफ) लागू करण्यासाठी खाणींच्या स्टार रेटिंगची एक प्रणाली विकसित केली आहे. सर्व मॉड्यूलमध्ये ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या खाणीला प्रतिष्ठित पंचतारांकित रेटिंग दिले जाते. ५-स्टार रेटिंगमुळे सुरजागड लोहखनिज खाण एसडीएफ अंतर्गत शाश्वत आणि पर्यावरणपूरक खाणकामाचे एक कृतिशील उदाहरण म्हणून नावारूपास येत आहे. 


हरित पोलाद निर्मितीसाठी प्रोत्साहन
व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले की, स्थानिक समुदायाचा पाठिंबा आणि चमूच्या कटिबद्धतेमुळेच हे यश मिळविणे शक्य झाले आहे. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात हरित पोलाद निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिक उत्साहाने काम करण्याची ऊर्जा आम्हाला ५-स्टार रेटिंगमुळे मिळाली आहे. 


स्थानिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न
हेडरी येथील CBSE-संलग्न लॉयड्स राज विद्यानिकेतन शाळा, लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमधील आधुनिक आरोग्य सुविधा, स्थानिक महिलांनी चालवलेले 'वन्या' कपडे उत्पादन युनिट, वाहनचालक प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रशिक्षण सुविधा, कौशल्य प्रशिक्षण उपक्रम यामुळे आदिवासी समुदायांमध्ये सामाजिक-आर्थिक पुनर्जागरणाला चालना देण्याचे काम कंपनीने केले आहे.


पर्यावरणपूरक खाण

  • गेल्या दोन वर्षापासून वार्षिक १० १ दशलक्ष टन क्षमतेच्या सुरजागड लोहखनिज खाणी चालवण्यात कार्यचालनातील उत्कृष्टता आणि हरित नवोपक्रमाला पंचतारांकित रेटिंगने राष्ट्रीय मान्यता दिली आहे.
  • पर्यावरणपूरक खनिकर्म उपक्रमांतर्गत बॅटरीवर चालणारी जड उपकरणे, एलएनजी वाहने आणि जगातील पहिल्या इलेक्ट्रिक कॉम्प्रेसर एक्स्कॅव्हेटर-माउंटेड ड्रिलसह विद्युतचलित ड्रिलच्या वापरावर भर देण्यात आला आहे. हवा, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वोत्तम पर्यावरणीय शाश्वतता पद्धतींचे एलएमईएल पालन करते.

Web Title: Surjagad Iron Ore Mine dominates in 'IBM' assessment; District's name elevated by getting 5-star rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.