अधिकाऱ्याचे अजब फर्मान ! 'माझ्या माणसांनाच कामे द्या, अन्यथा...' जिल्हा नियोजन अधिकारी पुन्हा वादात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:11 IST2025-10-07T19:04:05+5:302025-10-07T19:11:44+5:30
अम्ब्रीशराव यांची तक्रार : पाठराखण केल्याचा आरोप

Strange order from officer! 'Give work to my people, otherwise...' District Planning Officer in controversy again
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे आता नव्या वादात अडकले आहेत. माझ्या माणसांनाच कामे द्या अन्यथा बघून घेईन, अशी धमकी ते यंत्रणेतील अधिकाऱ्यांना देत असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी ठेवला आहे.
दि. ६ ऑक्टोबर रोजी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव, राज्यपाल, अपर मुख्य सचिव (नियोजन) व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. सत्ताधारी भाजपच्याच माजी राज्यमंत्र्यांनी केलेल्या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. अम्ब्रीशराव आत्राम यांनी केलेल्या दोन पानी लेखी तक्रारीत जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडेंच्या कारनाम्यांचा पाढा वाचला आहे. पाचखेडे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिल्याचा उल्लेख करून अम्ब्रीशराव यांनी लिहिले आहे की, कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ, लोकांशी उद्धट वर्तन, वाहनचालक कर्मचाऱ्यास पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकणे यामुळे त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त आहेत, पण त्यांना पाठीशी घातले गेले, त्यामुळे त्यांची हिंमत वाढली असून, माझे काहीही होऊ शकत नाही या अविर्भावात त्यांचा वावर आहे. प्रत्येक कामासाठी टक्क्यांप्रमाणे पत्नीच्या खात्यात रक्कम स्वीकारल्याची तक्रार कंत्राटदारांनी केली होती, मात्र, यातदेखील कुठलीही कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारदारांना धमकी व पैसे देऊन शांत करण्याचे पाचखेडे यांचे प्रयत्न असून, कारवाईला विलंब केल्यास गैरव्यवहाराला प्रोत्साहन मिळेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. अम्ब्रीशरावांच्या तक्रारीची प्रशासकीय वर्तुळात जोदार चर्चा सुरू झाली आहे.
सत्ताधारी नेत्यांच्या तक्रारीने खळबळ
सत्ताधारी भाजपच्याच माजी राज्यमंत्र्यांनी केलेल्या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. अम्ब्रीशराव आत्राम हे राज्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्रीही होते. त्यामुळे त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी पाचखेडेंविरोधात पाऊल उचलत केलेल्या तक्रारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यात प्रशासन आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
"कंत्राटदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वी चौकशी केलेली आहे. तो त्यांचा वैयक्तिक व्यवहार होता, असा खुलासा त्यांनी केलेला आहे. याउपर अन्य काही तक्रार व पुरावे असतील तर निश्चितपणे चौकशी करून कारवाई केली जाईल."
- अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी