चेहऱ्यावर हास्य, मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन... नक्षलवाद चळवळीच्या शेवटाच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल
By संजय तिपाले | Updated: October 15, 2025 13:58 IST2025-10-15T13:56:02+5:302025-10-15T13:58:50+5:30
शस्त्र ठेवले, संविधान घेतले : आता शहरी नक्षलवादाविरुध्द लढा तीव्र करणार : देवेंद्र फडणवीस

Smile on face, handshake with Chief Minister... An important step towards the end of the Naxalite movement
गडचिरोली : दंडकारण्यातील माओवादी चळवळीचा वरिष्ठ नेता व पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण ६१ जणांनी १४ ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती पत्कारली. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या सर्वांनी आत्मसमर्पण केले.
माओवाद्यांच्या गणवेशात भूपतीने आपल्याकडील शस्त्र मुख्यमंत्र्यांकडे सोपविले, मुख्यमंत्र्यांनी त्याच्या हाती संविधान देऊन त्याचे स्वागत केले. तीन दशके माओवाद्यांच्या अगणित हिंसक कारवायांचा रणनीतीकार राहिलेल्या भूपतीच्या चेहऱ्यावर आत्मसमर्पणावेळी हास्य, समाधान होते, हस्तांदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्याशी संवाद साधला.
माओवादी चळवळीतील अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणून याकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी ६१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पोलिस मुख्यालयावरील शहीद पांडू आलाम सभागृहात मुख्यमंत्र्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात भूपतीसह २० माओवाद्यांचे स्वागत केले. अलीकडेच प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (माओवादी) संघटनेची धुरा जहाल नेता थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी याच्याकडे सोपविली. या पदासाठी भूपतीही दावेदार मानला जात होता. देवजीने सूत्रे स्वीकारल्यानंतर माओवादी चळवळीत उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते भूपतीने युध्दबंदीचा प्रस्ताव ठेवला होता, यावरुन माओवादी चळवळीतील केंद्रीय नेतृत्वाशी त्याचे मतभेद झाले होते. सशस्त्र संघर्ष संपवून संवादाचा मार्ग स्वीकारा, अशी भूपतीची भूमिका संघटनेला मान्य नव्हती. ते हिंसक लढाईवर ठाम होते. त्यामुळे अखेर भूपतीने माओवाद्यांचा ६० जणांचा गट घेऊन आत्मसमर्पण केले. यावेळी संविधान देऊन मुख्यमंत्र्यांनी त्या सर्वांचे स्वागत केले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलिस महानिरीक्षक (अभियान) संदीप पाटील, विशेष अभियानचे अपर पोलिस महासंचालक छेरींग दोरजे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जि.प. सीईओ सुहास गाडे , पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.
'तारक्का'ने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
भूपतीची पत्नी व पॉलिट ब्युरो सदस्य विमला सिडाम उर्फ तारक्काने १ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. भूपतीचा भाऊ किशनजी याचा २०११ मध्ये पश्चिम बंगालमधील चकमकीत खात्मा झाला होता, त्याची पत्नी पाेथुला पद्मावती उर्फ सुजाता हिने १३ सप्टेंबर रोजी तेलंगणात आत्मसमर्पण केले होते. भूपतीच्या आत्मसमर्पणाने पत्नी तारक्काच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव होते. आयुष्याच्या सायंकाळी आता ते एकत्रितपणे सामान्यांप्रमाणे आयुष्य जगणार आहेत. तारक्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनीही तारक्का व भूपती यांचा एकत्रित सत्कार केला.
यांनी केले आत्मसमर्पण
आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये जहाल नेता भूपतीसह माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० मधील दहा केंद्रीय समिती सदस्य, उपकमांडर, विभागीय समिती सदस्य व सदस्यांचा समावेश आहे. सावी तुमरेटी, शर्मिला मडकाम, भीमा सोदी, अमोल सोदी, मंजू कोवाची, कोसा कोवासे, प्रियंका तेलामी, रोशनी कुडचामी, मधु टेकाम, सुरेश तलांडे, निर्मला तारामी, सुनल कुंजाम, सागर सिडाम, मैनू गावडे, शबीर उर्फ अर्जुन, निखील लेखामी, कलमसहाय वेलादी, स्वाती उर्फ सरोज उर्फ लता, विवेक उर्फ भास्कर यांच्यास ६१ जणांनी गणवेशात स्वयंचलित शस्त्रासह आत्मसमर्पण केले. १ कोटींचे बक्षीस मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हा पोलिस दलाला जाहीर केले. आत्मसमर्पित माओवाद्यांना पुनर्वसन योजनेद्वारे बक्षीस तसे विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
छत्तीसगड, तेलंगणातही आत्मसमर्पण होईल : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भूपतीसह ६१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण हा या हिंसक चळवळीच्या शेवटाच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यानंतर छत्तीसगड व तेलंगणातही अनेक महत्त्वाचे कॅडर आत्मसमर्पण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत माओवादमुक्तीचा संकल्प केला आहे. त्याआधीच महाराष्ट्रातून माओवाद संपेल. मात्र, यानंतरही सुरक्षा दलाला सतर्क रहावे लागेल. आता शहरी नक्षलवादाचा धोका वाढत आहे. लढाई शहरी नक्षलवादविरुध्द संविधान अशी आहे. यात संविधानच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.