तिकीट नाकारल्याने शिंदेसेनेतील महिला जिल्हाप्रमुखास मानसिक धक्का, बेपत्ता झाल्याचा राजकीय स्टंट असल्याचा आरोप
By संजय तिपाले | Updated: November 18, 2025 13:52 IST2025-11-18T13:49:50+5:302025-11-18T13:52:17+5:30
आरमोरी येथील घटना : पतीने केली होती पोलिसांत तक्रार, जिल्हाप्रमुख म्हणतात, हा राजकीय स्टंट

Shinde Sena's female district chief suffers mental shock after being denied ticket, allegation that her disappearance was a political stunt
गडचिरोली : पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शिंदेसेनेतील महिला जिल्हाप्रमुखास मानसिक धक्का बसल्याचे सांगून त्या १२ तासांपासून गायब असल्याचा दावा पतीने केल्यामुळे आरमोरी येथे खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्या वडिलांच्या घरी सुरक्षित आढळून आल्या. तथापि, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी हा राजकीय स्टंट असल्याचे स्पष्टीकरण दिले.
आरमोरी पालिकेत नगराध्यक्षपदासाठी ९ अर्ज आले आहेत. शिंदेसेनेकडून महिला जिल्हाप्रमुख अर्चना संतोष गोंदोळे या इच्छुक होत्या. मात्र, पक्षाने वेणूताई ज्ञानेश्वर ढवगाये यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अर्चना गोंदोळे नाराज झाल्या. पक्षाने ए.बी. फॉर्म वेणूताई ढवगाये यांना दिल्यानंतर अर्चना गोंदोळे या नाराज होऊन पालिकेच्या आवारातून बाहेर पडल्या, त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. त्यांचे पती संतोष यांनी १८ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकून पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांवर आरोप केला होता. शिवाय तिकीट नाकारल्याने पत्नीला मानसिक धक्का बसला असून ती १२ तासांपासून गायब असल्याचे म्हटले होते. पत्नीच्या जीवाला काही बरेवाईट झाल्यास संबंधित पदाधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही दिला होता. यानंतर त्यांनी पोलिसांतही धाव घेतली. मात्र, याच दरम्यान त्या आरमोरीतीच वडिलांच्या घरी सुरक्षित आढळल्या. आरमाेरी पोलिसांनी यास दुजोरा दिला.
पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
दरम्यान, जिल्हाप्रमुख पदावरुन शिंदेसेनेत यापूर्वीच पदाधिकाऱ्यांत मोठा वाद झाला होता. गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात तीन महिन्यांपूर्वी पदाधिकारी भिडले होते. आता उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगले आहे. यामुळे पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
"पक्षाने उमेदवारी नाकारली, त्याला आम्ही पदाधिकारी कसे काय जबाबदार असू शकतो. विरोधकांच्या सांगण्यावरुन ही स्टंटबाजी करुन आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. यात कुठलेच तथ्य नाही."
- संदीप ठाकूर, जिल्हाप्रमुख शिंदेसेना