नगर परिषदेच्या शाळा टाकणार कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:47 IST2018-01-18T00:46:50+5:302018-01-18T00:47:10+5:30
शहरातील नगर परिषदेच्या १० प्राथमिक शाळांचा दर्जा आणखी वाढविण्यासाठी काही भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी नगर परिषदेच्या फंडातून तरतूद केली जाणार आहे.

नगर परिषदेच्या शाळा टाकणार कात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील नगर परिषदेच्या १० प्राथमिक शाळांचा दर्जा आणखी वाढविण्यासाठी काही भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी नगर परिषदेच्या फंडातून तरतूद केली जाणार आहे.
सध्या न.प.च्या १० शाळांमधून १४६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थी संख्या जास्त असली तरी एका वर्गात सरासरी २८ विद्यार्थी असे प्रमाण सध्या आहे. वर्गखोल्या आणि उपलब्ध जागा पाहता नगर परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या आणखी वाढण्यासाठी वाव आहे.
पहिली ते आठवडीपर्यंतच्या न.प.कडे केवळ तीन शाळा आहेत. त्यात रामनगरातील जवाहर नेहरू विद्यालयाने विविध सुविधा आणि दर्जाच्या बाबतीत आयएसओ मानांकन पटकावले आहे. त्याच धर्तीवर इतर शाळांचा दर्जा सुधाण्यासाठी शाळांना एलईडी लाईट, पंखे, काही शाळांना नवीन डेस्क बेंच, विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स तसेच स्कूल बॅगही दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सध्या ७ ते ८ लाख रुपयांची तरतूद नगर परिषदेच्या फंडातून करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सर्व १० शाळा डिजीटल आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळत आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेश, शिक्षण शुल्क आणि खेळाचे साहित्य आदी पुरविले जाते. मात्र नगर परिषदेच्या मर्यादित निधीमुळे अनेक कल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य होत नाहीत अशी खंत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. तरीही शैक्षणिक दर्जा राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.
या शाळांवर ५५ शिक्षकांचे पदे मंजूर असली तरी ४९ पदेच भरलेली आहेत. रिक्त असलेल्या ६ जागा भरण्यासाठी नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडे पाठपुरावा सुरू आहे.