शाळा साहित्याचे कंत्राट नियमबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:56 IST2018-01-15T22:55:45+5:302018-01-15T22:56:23+5:30
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला शनिवारी आकस्मिक भेट दिली असता, या भेटीत सदर शाळेच्या गृहपाल गैरहजर आढळून आल्या.

शाळा साहित्याचे कंत्राट नियमबाह्य
आॅनलाईन लोकमत
सिरोंचा : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला शनिवारी आकस्मिक भेट दिली असता, या भेटीत सदर शाळेच्या गृहपाल गैरहजर आढळून आल्या. तसेच गणवेश, भाजीपाला व पाठ्यपुस्तक वाटपाचे कंत्राट नियमबाह्य असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले.
याप्रसंगी आविसंचे पदाधिकारी आकुला मल्लीकार्जुनराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश गंजीवार, आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, सिरोंचाचे माजी उपसरपंच रमेश सल्लम, प्रसाद मद्दीवार, पेंटिपाकाचे उपसरपंच कुमरी सडवली, रवी बोंगोनी, जाफ्राबाद ग्रामपंचायतीचे उपसरपंच दुर्गम तिरूपती आदी उपस्थित होते.
गणवेश, भाजीपाला व पाठ्यपुस्तक आदी वाटपाचे कंत्राट हे एकदाच निविदा मागवून संबंधितांना कंत्राट दिल्याचे जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आले. कमी दराने पुरवठा करणाºया कंत्राटदारांना कंत्राट न देता जादा दराने या साहित्याचा पुरवठा करणाºया कंत्राटदाराला नियमबाह्यरित्या कंत्राट दिल्याचे यावेळी दिसून आले. सदर शाळेच्या गृहपालांनी तीन दिवसांच्या रजेचा अर्ज दिला. मात्र सहा दिवसांपासून त्या शाळेत गैरहजर असल्याचे हजेरी रजिस्टरवरून दिसून आले. या दोन्ही प्रकाराबाबत उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणवेश, भाजीपाला, पाठ्यपुस्तकाच्या नियमबाह्य कंत्राटाबाबत संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, असा शेरा उपाध्यक्ष कंकडालवार यांनी भेटीच्या रजिस्टरमध्ये नमूद केला. याप्रसंगी कंकडालवार यांनी विद्यार्थिनींशी तसेच तेथील शिक्षकांशी चर्चा करून शाळेच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत कारवाई होणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.