स्कूलबस भाड्यात लूट ! शाळा दहा महिने पण भाडे घेतात बारा महिन्यांचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:21 IST2025-02-20T15:20:10+5:302025-02-20T15:21:27+5:30
Gadchiroli : शिक्षण विभागासह प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रणच नाही

School bus fare robbery! Schools run for ten months but charge twelve months' fare
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटचे प्रमाण वाढले असून पालकही आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येशिक्षण घेण्यासाठी पाठवत आहेत. दरम्यान इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा पालकांकडून प्रचंड शुल्क आकारत आहे. दुसरीकडे शालेय सत्र १० महिन्यांचे मात्र स्कूलबस व व्हॅनचे भाडे बारा महिन्यांचे घेतले जात असल्याचे काही शाळांमध्ये दिसून येत आहे. स्कूलबसच्या नावे पालकवर्गाची होणारी लूट केव्हा थांबणार? असा सवाल काही सूज्ञ पालकांनी केला आहे.
आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तसेच अहेरी तालुक्यात व शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. नर्सरी पासून दहावी व बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा या शाळांमध्ये आहे.
पालकही अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतात. दरम्यान काही शाळांमार्फत आगामी शैक्षणिक सत्रात प्रवेश व शिक्षण शुल्क वाढविणार असल्याचे दिसून येते. दरम्यान स्कूलबस व व्हॅनचे भाडेही वर्षभराचे घेतले जात असल्याचा प्रकार काही ठिकाणी दिसून येतो.
शाळेची फीस ५० हजार; बसभाडे २० हजार
गडचिरोली शहरात इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गासाठी वर्षभराचे शुल्क ४० ते ५० हजार रुपये पालकांकडून घेतले जात आहे. शाळेचे वर्षभराचे शुल्क तर वाढत आहेच शिवाय बसेसचे भाडेही वाढविले जात आहे. अंतरानुसार स्कूलबसचे भाडे आकारले जात असून वर्षाला २० हजार रुपये मोजावे लागत आहे.
शाळांमुळे पालकांचे गणित बिघडतेय
शाळाचे प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क तसेच स्कूल भाडे व तत्सम खर्च वाढत असल्याने बहुतांश पालकांचे आर्थिक बजेट बिघडले असल्याचे दिसून येते. हा खर्च उचलताना सामान्य पालकांची दमछाक होत असते.
यंदाही भाडेवाडीचा प्रस्ताव
काही शाळांनी स्कूलबस भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला असून तो आगामी शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ होत असल्याचे सांगण्यात येते.
शाळांची भूमिका काय ?
शहरी भागातील खासगी शाळांकडून शिक्षण शुल्क, प्रवेश शुल्क तसेच बसभाडे पालकांना विचारात न घेता वाढवून घेतात. याचा परिणाम अनेकांच्या बजेटवर होत असतो. पालकांनी याबाबत संघटित होणे गरजेचे आहे. शासनाने पालकांच्या समितीला विशेष अधिकार देणे गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.
व्हॅनचा २ महिन्यांचा अतिरिक्त भुर्दंड का?
वर्षभरातून शाळा १० महिने नियमित भरते. उन्हाळ्यातील मे व जून असे दोन महिने सुट्या असतात. मग वर्षभराचे स्कूल बसभाडे कसे? असा सवाल काही पालकांनी उपस्थित केला आहे. सणानिमित्त अनेकदा शाळांना सुट्या येतात. रविवारला सुटी असते. अनेकदा संप, आंदोलने यादरम्यानही शाळा बंद असते. एकूणच महिन्यातून २० दिवसच शाळा भरत असते. मात्र स्कूल बस भाडे ३० दिवसांचे घेतले जाते.
स्टेशनरीच्या खर्चाने कंबरडे मोडले
गेल्या तीन ते चार वर्षांपासून शैक्षणिक साहित्याच्या किमती वाढत आहेत. साहित्याचे दर दरवर्षी वाढत असल्याने सर्वसामान्य पालक महागाईने प्रस्त झाले आहेत.
"खासगी शाळांनी शुल्क वाढविले असल्यामुळे सामान्य पालक त्रस्त झाले आहेत. सरकारचे शुल्क वाढीवर कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही."
- प्रेमिला बोरकुटे, पालक
"सरकारने खासगी शाळांच्या शुल्क वाढीवर मर्यादा आणाव्यात. जेणेकरून सामान्य पालकांना दिलासा मिळेल. याबाबत सामाजिक संघटनांनी लढा द्यावा."
- रवींद्र गेडाम, पालक