अडीच लाख अभिलेखांचे स्कॅनिंग

By Admin | Updated: December 4, 2015 01:37 IST2015-12-04T01:37:39+5:302015-12-04T01:37:39+5:30

जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मागील एक वर्षांपासून संपूर्ण दस्तावेज (अभिलेख) स्कॅनिंग करून त्याचे डिजिटलायझेशन करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

Scanning of 2.5 lakh records | अडीच लाख अभिलेखांचे स्कॅनिंग

अडीच लाख अभिलेखांचे स्कॅनिंग

भूमी अभिलेख विभाग : एका क्लिकवर मिळणार दाखला; दस्तावेजाला पुनर्जीवन
दिगांबर जवादे गडचिरोली
जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मागील एक वर्षांपासून संपूर्ण दस्तावेज (अभिलेख) स्कॅनिंग करून त्याचे डिजिटलायझेशन करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हाभरातील १ हजार ६८८ गावांमधील ५ लाख ६५ हजार ६४३ अभिलेखांपैकी २ लाख ५१ हजार ३८१ अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटलायझेशन करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
भूमी अभिलेख विभागाकडे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे जमिनीशी संबंधित विविध प्रकारची कागदपत्रे व नोंदी आहेत. काही नोंदी व कागदपत्रांना १०० वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. काळाच्या ओघात सदर दस्तावेज नष्ट होण्याचा व त्यावरील नोंदी मिटण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही कार्यालयांमधील कागदपत्रे आग लागल्यामुळे, उंदरांनी कुरतडल्याने किंवा पावसामध्ये भिजल्याने नष्टही झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे रेकॉर्ड नष्ट झाले अशा शेतकऱ्यांना आता भूमी अभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तरीही दस्तावेज मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. दस्तावेजांच्या अभावामुळे जमिनीचे वाद न्यायालयापर्यंत पोहोचले आहेत.
कागदी दस्तावेजांच्या या सर्व अडचणी लक्षात घेऊन भूमी अभिलेख व महसूल विभागाने जमिनीशी संदर्भात असलेले संपूर्ण कागदपत्रांचे स्कॅनिंग करून त्यांचे डिजीटलायझेशन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्यात जमिनीशी संदर्भात असलेले ५ लाख ६५ हजार ६४३ दस्तावेज आहेत. यातील २ लाख ५१ हजार ३८१ दस्तावेजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. गडचिरोली तालुक्यातील २६ हजार ८५२ दस्तावेजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर चामोर्शी ३० हजार ९८९, देसाईगंज १६ हजार ६६४, मुलचेरा ८ हजार ७४६, कोरची ४० हजार ९८८, कुरखेडा तालुक्यातील ४४ हजार १४७ दस्तावेजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर ३० नोव्हेंबरपर्यंत धानोरा तालुक्यातील ४० हजार ३२३, भामरागड तालुक्यातील ४ हजार ९०१, अहेरी तालुक्यातील ३७ हजार ७७१ दस्तावेजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. या तीन तालुक्यांमध्ये दस्तावेजांचे स्कॅनिंग करण्याचे काम अजुनही चालूच आहे. उर्वरित सिरोंचा, आरमोरी, एटापल्ली या तालुक्यांमधीलही दस्तावेज स्कॅनिंग करण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होईल, अशी माहिती जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक जी. बी. डाबेराव यांनी दिली आहे.

स्कॅनिंग करण्यात येत असलेले अभिलेख
दस्तावेज स्कॅनिंग करण्याच्या कामाचे कंत्राट हैदराबाद येथील एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेच्यावतीने बंदोबस्त मिसल, आकारबंद बंदोबस्त, आकारबंद पुनर्मोजणी, आकारबंद एकत्रीकरण, आकारफोड पत्रक, गुणाकार बुक, दुर्बिन गणित कामसंच, कमी-जास्त पत्रक, शेतपुस्तक, जबाबपंजी, एकत्रिकरण गाव पी.सी., पॉलिगॉन शिट, साईड पत्रक, ताबे पावती, ग्रामपंजी, ट्रॅव्हर्स पत्रक या अभिलेखांचे स्कॅनिंग करून डिजीटायझेशन करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम
जमिनीशी संदर्भातील शेकडो वर्षापूर्वीच्या दस्तावेजाची स्कॅनिंग करण्यात येत आहे. त्यामुळे दस्तावेज हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. सदर दस्तावेज गहाळ करण्यात येऊ नये, त्याचबरोबर स्कॅनिंग करताना योग्य काळजी घेण्यात यावी, त्याचे स्कॅनिंग चांगल्या पध्दतीने करण्यात यावे, यासाठी तालुका व जिल्हा कार्यालयात अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक जी. बी. डाबेराव यांनी दिली.

अभिलेख मिळण्यातील अडचणी होणार दूर
स्कॅनिंग केल्यानंतर सदर दस्तावेज संगणकात सेव्ह करून ठेवण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. तालुकास्तरावर दाखल्यांचे स्कॅनिंग केल्यानंतर सदर दाखल्याची गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयात मेटा डेटा एन्ट्री करण्यात येत आहे. या एन्ट्रीमुळे दस्तावेज शोधण्यास मदत होणार आहे. मेटा डेटा एन्ट्री करण्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.

Web Title: Scanning of 2.5 lakh records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.