रेशन दुकानदार होणार बँक प्रतिनिधी
By Admin | Updated: April 2, 2017 01:42 IST2017-04-02T01:42:13+5:302017-04-02T01:42:13+5:30
पात्र स्वस्त धान्य दुकानदारांना बँकांचे व्यवसाय प्रतिनिधी नेमण्याच्या कामाला गती देण्यात यावी,

रेशन दुकानदार होणार बँक प्रतिनिधी
नियुक्ती प्रक्रियेला गती द्या : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
गडचिरोली : पात्र स्वस्त धान्य दुकानदारांना बँकांचे व्यवसाय प्रतिनिधी नेमण्याच्या कामाला गती देण्यात यावी, अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिल्या.
स्थानिक मंडळ कार्यालयाच्या इमारतीत बँक प्रतिनिधी आणि रेशन दुकानदार यांचे एक दिवशीय शिबिर शनिवारी आयोजित करण्यात आले. या शिबिराला भेट देऊन जिल्हाधिकारी नायक यांनी पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदूरकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे आदी उपस्थित होते. या शिबिरात भारतीय स्टेट बँकेचे अरूणकुमार, जिल्हा अग्रणी बँकेतर्फे एस. आर. खांडेकर यांनी उपस्थित रेशन दुकानदारांना बँकांचे व्यवसाय प्रतिनिधी बनविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सांगितल्या. आर्थिक व्यवहार सुलभ होण्यासाठी रेशन दुकानदारांना व्यवसाय प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिबिराला सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यातील रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)