जनसुरक्षा कायद्याचा वापर ईडीप्रमाणेच होईल : अनिल देशमुख यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:47 IST2025-07-30T18:47:06+5:302025-07-30T18:47:56+5:30

Gadchiroli : गडचिरोलीत पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका

Public Safety Act will be used like ED: Anil Deshmukh alleges | जनसुरक्षा कायद्याचा वापर ईडीप्रमाणेच होईल : अनिल देशमुख यांचा आरोप

Public Safety Act will be used like ED: Anil Deshmukh alleges

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
दहशतवाद रोखण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाच्या तस्करीला रोख लावण्याकरिता संयुक्त राष्ट्रात ईडीसारखा कायदा अस्तित्वात आणला. भारतात २००४ मध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली; पण, याचा वापर राजकीय सूड उगविण्यासाठी करण्यात आला. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विशेष जन सुरक्षा कायद्याचादेखील वापर सत्ताविरोधी घटकांच्या विरोधात करण्यात येईल, असा आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांनी केला.


२९ जुलै रोजी पक्षाच्या बैठकीसाठी ते येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, विधीमंडळात सत्ताधाऱ्यांनी पाशवी बहुमताच्या जोरावर विशेष जन सुरक्षा विधेयक पारित केले. येणाऱ्या काळात या कायद्याचा वापर सत्तेच्या विरोधात मत प्रदर्शन करणारे राजकीय नेते, शेतकरी, चळवळीतील कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या विरोधात होणार आहे. 'ईडी'च्या गैरवापरासंदर्भात नुकतेच सरन्यायाधीशांनी फटकारले आहे. 


निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून शेतकरी कर्जमाफी करू, असे सांगितले होते. सत्तेत आल्यानंतर त्यांना आश्वासनांचा विसर पडला असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येत आहे. पोलिसांवर हल्ले वाढले, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिला अत्याचाराविरोधात आघाडी सरकारने आणलेला शक्ती कायद्याचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही, असा दावा त्यांनी केला.


माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम आणि शाहीन हकीम यावेळी उपस्थित होते.


९ ऑगस्टला मंडल यात्रेचा प्रारंभ
व्ही.पी. सिंह यांनी देशात ओबीसींसाठी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या. महाराष्ट्रात शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना त्यांची अंमलबजावणी केली. ओबीसींसाठी दिलेल्या योगदानाची माहिती व्हावी तसेच जनजागृती व्हावी यासाठी ९ ऑगस्टला क्रांती दिनी मंडल यात्रेचा प्रारंभ शरद पवार यांच्या हस्ते नागपुरातून होणार आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

Web Title: Public Safety Act will be used like ED: Anil Deshmukh alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.