खाटेची कावड करुन गर्भवतीला नेले रुग्णालयात ! गडचिरोली जिल्ह्यातील विदारक वास्तव पुन्हा आले समोर
By संजय तिपाले | Updated: October 14, 2025 20:33 IST2025-10-14T20:31:32+5:302025-10-14T20:33:16+5:30
एटापल्लीतील विदारक स्थिती : ग्रामस्थांनी एक किलोमीटर पायपीट करीत वाचविले प्राण

Pregnant woman taken to hospital after covering her bed! The shocking reality of Gadchiroli district has come to light again
गडचिरोली : रस्त्याअभावी चारचाकी वाहन पोहोचत नसलेल्या एटापल्ली तालुक्याच्या गोटाटोला गावात १४ ऑक्टोबर रोजी रुनिता दुम्मा (२०) या गर्भवतीला खाटेची कावड करुन दवाखान्यात नेण्यात आले. गावकरी व डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तिचे प्राण वाचले. मात्र, यामुळे आदिवासीबहुल भागातील पायाभूत सुविधांची विदारक स्थिती पुन्हा एकदा समोर आली.
रुनिता दुम्मा (२०) ही मूळची कसनसूरजवळील रेकनार गावीच आहे. ती प्रसूतीसाठी गोटाटोला येथे माहेरी आली होती. १४ ओक्टोम्बर रोजी सकाळी तिला अचानक प्रसववेदना जाणवू लागल्या. त्यानंतर कुटुंबियांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. गोटाटोला येथील आशा सेविकेने तत्काळ जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवले. माहिती मिळताच समुदाय आरोग्य अधिकारी गजानन शिंदे यांनी वैद्यकीय चमूसह रुग्णवाहिका रवाना केली, परंतु गोटाटोला गावाकडे जाणारा तीन किलोमीटरचा रस्ता खराब असल्याने वाहन गावात पोहोचू शकले नाही. अखेर कुटुंबीय व गावकऱ्यांनी खाटेची कावड केली व एक किलोमीटर अंतर पायपीट केली. पक्का रस्ता आल्यावर रुग्णवाहिकेतून तिला तातडीने आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा महिला रुग्णालयात हलवण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे म्हणाले, गावकऱ्यांच्या मदतीने तातडीने गरोदर मातेला सुरक्षितपणे रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले गेले. प्रकृती आता स्थिर असून डॉक्टर योग्य ती काळजी घेत आहेत.
रस्ता प्रश्नी गावकरी आक्रमक, मतदानावर बहिष्काराचा इशारा
रस्ता प्रश्न गंभीर बनल्याने गोटाटोला ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. स्थानिकांनी स्वातंत्र्य दिनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरच रस्ता बांधण्याचे आश्वासन दिले होते. तात्पुरती डागडुजी केली. मात्र, पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' झाल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.