पूल बांधकामाची पाहणी
By Admin | Updated: May 9, 2017 00:48 IST2017-05-09T00:48:35+5:302017-05-09T00:48:35+5:30
तालुक्यातील मुधोली चक जवळील वैनगंगा नदीवर घाटकूळ गावालगत पुलाचे बांधकाम सुरू आहे.

पूल बांधकामाची पाहणी
आमदारांनी दिली भेट : घाटकूळ परिसरातील नागरिकांसाठी सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील मुधोली चक जवळील वैनगंगा नदीवर घाटकूळ गावालगत पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलामुळे घाटकूळ परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यात ये-जा करणे सुकर होणार आहे. या पुलाच्या बांधकामाची पाहणी आ. डॉ. देवराव होळी यांनी नुकतीच केली.
सदर पूल गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना थेट पोंभूर्णा तालुक्यात ये-जा करणे सोयीचे होणार आहे. या पुलाच्या बांधकामाकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० कोटी रूपये मंजूर केले. त्यानंतर या पुलाचे बांधकाम सुरू झाले. या पुलामुळे चामोर्शी ते थेट चंद्रपूर व चंद्रपूर ते गडचिरोली असा प्रवास अत्यल्प कमी अंतरात होणार आहे. चामोर्शी तालुक्यातील येनापूर, लक्ष्मणपूर, गणपूर, मुधोली या परिसरातील गावांचाही विकास होणार आहे. या भागातील नागरिकांना आपल्या विविध वस्तू चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी तसेच शैक्षणिक व अन्य कामासाठी ये-जा करण्यास सोयीस्कर होणार आहे. या भागात भाजीपाला, कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांसाठी पूल फायदेशिर ठरणार आहे. या पुलामुळे मुधोली चक येथून बायपास रोडकरिता भूमीअधीग्रहण सुरू आहे. तसेच येनापूर ते मुधोली चक हा रस्ता जिल्हा प्रमुख मार्गामध्ये घेण्यात आला आहे. तसेच या भागात दळणवळण वाढीस लागणार असून रोजगाराची निर्मितीही होण्यास मदत होणार आहे. सध्या या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आ. डॉ. देवराव होळी यांनी पूल बांधकामाची पाहणी केली. तालुक्यातील नागरिकांसाठी हा पूल वरदान ठरणार आहे, असे मतही आ. डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता युवा मोेर्चाचे स्वप्नील वरघंटे, रमेश अधिकारी, अधीक्षक मानकर व बांधकामाशी संबंधित नागरिक उपस्थित होते.