गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव केंद्रावर २०२३-२४ मध्ये धान खरेदी व बारदान्यामध्ये दीड कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. चौकशीत २०२४-२५ या चालू वर्षीही याच संस्थेत सव्वा दोन कोटीरुपयांचा गैरव्यहार उघडकीस आला आहे. त्यामुळे संस्था पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था, देऊळगाव खरेदी केंद्रावर २०२३-२४ मध्ये १ कोटी ५३ लाखांचा गैरव्यावहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या घोटाळ्याची चर्चा सुरु असतानाच आता पार्ट टू समोर आला आहे. यात चौकशी समितीने २०२४-२५ मध्ये देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील धान वजनात ६ हजार १४० क्विंटल तर १३ हजार ५१४ बारदान्यांच्या नगाची तफावत समोर आली आहे. याचे एकूण बाजारमूल्य दोन कोटी ३० रुपये इतके आहे.
याचा अहवाल चाैकशी पथकाने आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे यांना सादर केला. त्यानंतर संबारे यांनी ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना याबाबत पत्र लिहून कळविले आहे. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगाव येथील संस्थाध्यक्ष, संचालक व सचिव यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.
गुन्हा कधी दाखल होणार ?दरम्यान, या प्रकरणात आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी ९ एप्रिल रोजी संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे.मात्र, अद्यापही गुन्हा नोंद झालेला नाही. दोन्ही वर्षांतील घोटाळ्याचा एकत्रित गुन्हा नोंद होणार की स्वतंत्र गुन्हे नोंदविणार हेही स्पष्ट नाही.