आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 06:20 IST2025-10-16T06:20:35+5:302025-10-16T06:20:47+5:30
चेहऱ्यावर हास्य, हातात संविधान... भूपतीसह ६१ माओवाद्यांची शरणागती!

आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दंडकारण्यात तीन दशके हिंसेचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या माओवादी चळवळीचा रणनीतीकार जहाल नेता, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याच्यासह तब्बल ६१ माओवादी गडचिरोली पोलिसांना शरण आले. बुधवारी देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत त्या सर्वांचे आत्मसमर्पण झाले. माओवादी गणवेशात भूपतीने रायफल मुख्यमंत्र्यांच्या हाती दिली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्या हाती संविधान ठेवत त्याचे स्वागत केले.
नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या जिल्ह्यांची संख्या आता केवळ ३वर आली आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी सांगितले. छत्तीसगडमधील बीजापूर, सुकमा व नारायणपूर यांचा समावेश आहे. नक्षलवादाने प्रभावित जिल्हे ६ वरून ३ पर्यंत खाली घसरल्याचे ते म्हणाले.
पतीच्या आत्मसमर्पणाने ‘तारक्का’ला आनंदाश्रू
भूपतीची पत्नी व माओवादी पॉलिट ब्युरो सदस्य विमला सिडाम ऊर्फ तारक्काने १ जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. पतीच्या आत्मसमर्पणाच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. आता आम्ही सामान्यांप्रमाणे आयुष्य जगणार, असे भावनिक उद्गार तिने काढले. मुख्यमंत्र्यांनी भूपती व तारक्काचा संयुक्त सत्कार केला. तसेच गडचिरोली पोलिस दलाला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
यांनी केले आत्मसमर्पण
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये भूपतीसह दोन केंद्रीय समिती सदस्य, १० विभागीय समिती सदस्य असलेल्या कॅडरसह एकूण ६१ जणांचा समावेश आहे. विवेक ऊर्फ भास्कर, स्वाती सायलू, शबीर ऊर्फ अर्जुन, जितरु ऊर्फ गंगू नुप्पो, दलसू ऊर्फ मैनू गावडे, सागर ऊर्फ सुक्कु सिडाम, पद्मा होयाम, अंजू ऊर्फ लीना चिंताकिदी, रविकुमार ऊर्फ मल्लेश मनुगाला, राजू ऊर्फ कलमसाय वेलादी, निखिल ऊर्फ राजेश लेकामी, सावी तुमरेटी, शर्मिला मडकाम, भीमा सोदी, अमोल सोदी, मंजू कोवाची, निर्मला तारामी, सुनल कुंजाम, सागर सिडाम, निखिल लेखामी आदींचा समावेश आहे. ५४ अग्निशस्त्रांसह त्यांनी आत्मसमर्पण केले.
भूपतीसह ६१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण हे या हिंसक चळवळीच्या शेवटाकडे टाकलेले मोठे पाऊल आहे. मात्र, आता शहरी नक्षलवादाचाच धोका वाढला आहे. लढाई शस्त्रांनी नव्हे, संविधानानेच जिंकायची आहे आणि संविधानच जिंकेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री