पीयूसी नाही; ५० रुपयांसाठी भरला लाखो रुपयांचा दंड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 17:46 IST2024-06-27T17:46:02+5:302024-06-27T17:46:41+5:30
चालकांनो, खबरदार! : प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसल्यास कारवाई

No PUC certificate; Millions of rupees fine paid for 50 rupees!
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रस्त्यांवर वाहने चालविण्यासाठी, तसेच आपले वाहन प्रदूषण करीत तर नाही ना, हे दर्शविणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र दुचाकीसह विविध प्रकारच्या वाहनधारकांना सोबत बाळगावे लागते.
मोटार वाहन कायद्यानुसार पीयूसी (प्रदूषण नियंत्रण) प्रमाणपत्र अनिवार्य आहे, तरीही अनेक वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात. ५० रुपयांत मिळणारे प्रमाणपत्र नसेल, तर त्या वाहनधारकांवर कारवाई होऊ शकते. जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत सव्वा लाखांवर अधिक रुपयांचा दंड वाहनधारकांनी पीयूसीअभावी भरला आहे. वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून मोटार वाहन कायद्यानुसार जबर दंडाच्या तरतुदी केल्या जात आहेत. दुचाकी असो किंवा चारचाकी, सर्वच वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र सक्तीचे आहे. अन्यथा कारवाई केली जाते.
पीयूसी नसेल तर दंड किती?
• दुचाकींसाठी दोन हजार : दुचाकी वाहनांसाठी ५० ते १०० रुपयांत पीसूसी प्रमाणपत्र घेता येते. जर वाहनधारकाकडे पीसूसी नसेल, तर त्याच्यावर दोन हजार रुपयांचा दंड बसतो. वाहतूक पोलिस किंवा आरटीओकडून हा दंड ठोठावला जाऊ शकतो.
• चारचाकींसाठी चार हजार : चारचाकी वाहनासाठी १२५ रुपयांमध्ये पीयूसी चाचणी केली जाते. चारचाकी वाहनधारकांकडे पीयूसी नसेल, तर त्या वाहनधारकावर चार हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
सहा महिन्याला पीयूसी
वाहन नवीन असेल, तर कंपनीमार्फत एक वर्षासाठी पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर, त्याची मुदत संपल्यानंतर वाहनधारकांना दर सहा महिन्यांनी पीयूसी चाचणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.
ऐन वेळी काढली जाते पीयूसी
• बंधनकारक असतानाही पीयूसी काढण्याकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण मोठे आहे.
• कारवाई सुरू झाल्यानंतरच त्या काळात पीयूसी काढली जाते, तसेच वाहनाचा विमा काढताना अथवा पुननोंदणी करताना पीयूसी काढली जाते.
पीयूसी नसल्यास विमा विसरा
एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि संबंधित वाहन मालकाकडे वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विमा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. एवढे महत्त्वाचे दस्तावेज असतानाही त्याकडे दुर्लक्ष होते.
पीयूसी का महत्त्वाची?
आपले वाहन प्रदूषण करते काय, ही बाब पीयूसी तपासणीत स्पष्ट होते. वाहन जर प्रदूषण करीत असेल, तर संबंधित वाहन मालकाला ते वाहन दुरुस्त करण्याचा सल्ला दिला जातो, यासाठी पीयूसी महत्त्वाची आहे.