रस्त्यावर खड्डे नाही, आता शेती! नागरिकांचा हटके विरोध आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:22 IST2025-08-19T18:21:49+5:302025-08-19T18:22:24+5:30
Gadchiroli : जिमलगट्टा येथे अनोखे आंदोलन, वेधून घेतले लक्ष

No more potholes on the road, now farming! Citizens stage protest
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : तेलंगणाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी वर जिमलगट्टा (ता. अहेरी) येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे महामार्ग विभागाससह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी स्थानिक नागरिकांनी खड्ड्यांत धान रोवणी केली, तसेच वृक्षलागवड करून निषेध नोंदविला.
गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची दुरवस्था झाली असून, वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. १० दिवसांत तत्काळ खड्डे बुजवावेत, रखडलेले महामार्गाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, या मागणीसाठी १८ ऑगस्टला सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात धान रोवणी व वृक्षलागवड केली.
अपघाताचा वाढला धोका
महामार्गाची दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. मागील तीन वर्षापासून ही स्थिती असून अनेकदा विनंती करून, निवेदने देऊनही महामार्ग विभागाने उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष आहे. खड्डे चुकविताना अपघात होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
...तर तीव्र आंदोलन
याबाबत उपाययोजना न केल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संतोष ताटीकोंडावार यांनी दिला. मरपल्लीचे सरपंच शंकर नैताम, ग्रा.पं. सदस्य सालाया कंबलवार, राजू मामीडवार, कोंजेडच्या माजी सरपंच ज्योती मडावी, यशवंत डोंगरे, स्नेहदीप आत्राम, शंकर रंगूवार, अरुण वेलादी, साईश उपग्नलावार, नंदेश्वर मेश्राम, शैलेश कोडापे, महेश बोरकुट आदी उपस्थित होते.