गडचिरोलीत गावक-यांनी जाळले नक्षलवाद्यांचे बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 19:17 IST2018-05-22T19:17:10+5:302018-05-22T19:17:10+5:30
कसनासूर-बोरिया येथील चकमकीविरोधात १९ ते २५ मेदरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहानिमित्त बंद पुकारण्यात आला. यासंदर्भात काही ठिकाणी बॅनर व पत्रके टाकल्याने दहशतीचे वातावरण असले तरी कुमारगुडा फाटा येथे गावक-यांनी नक्षली बॅनरची होळी करून निषेध व्यक्त केला.

गडचिरोलीत गावक-यांनी जाळले नक्षलवाद्यांचे बॅनर
गडचिरोली - कसनासूर-बोरिया येथील चकमकीविरोधात १९ ते २५ मेदरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहानिमित्त बंद पुकारण्यात आला. यासंदर्भात काही ठिकाणी बॅनर व पत्रके टाकल्याने दहशतीचे वातावरण असले तरी कुमारगुडा फाटा येथे गावक-यांनी नक्षली बॅनरची होळी करून निषेध व्यक्त केला.
आलापल्ली-भामरागड मार्गावरील मौजा कुमारगुडा फाटा येथे नक्षल्यांनी लावलेले बॅनर गावकºयांनी काढून त्याची होळी केली. नक्षलवाद्यांच्या बंदच्या आवाहनाला कुमारगुडाच्या नागरिकांनी विरोध दर्शवून नक्षलविरोधी घोषणाही दिल्या. दरम्यान भामरागड तालुका मुख्यालयापासून ५ ते ६ किमी अंतरावर बॅनर आणि पत्रके आढळल्याने गडचिरोली-लाहेरी आणि नागपूर-भामरागड या दोन्ही बसगाड्यांना सोमवारी सायंकाळी माघारी फिरत ताडगाव पोलीस ठाण्यात बसेस जमा कराव्या लागल्या. नागपूर-भामरागड ही बस भामरागडला मुक्कामी येत होती. पण बस तेथूनच परत गेली.
मागील महिन्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले. नक्षल्यांच्या मोठ्या कॅडरमधील लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पत्रके आणि बॅनर लावून शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन केले. याचाच भाग म्हणून तीन दिवसांपूर्वी तलवाडा येथे वनविभागाचे २३ बीट नक्षल्यांनी जाळून आणि मार्गात झाडे आडवी टाकून मार्ग अडविला होता. सोमवारी सायंकाळी पुन्हा आलापल्ली-भामरागड मुख्य मार्गावर नक्षलवाद्यांनी पत्रके आणि बॅनर बांधल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.