विलय दिनी घातपाताचा डाव फसला, चकमकीत नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:05 IST2021-09-21T12:04:34+5:302021-09-21T12:05:36+5:30

भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मडवेली जंगल परिसरात रविवारी विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला.

The Naxalite camp was destroyed in the encounter in gadchiroli | विलय दिनी घातपाताचा डाव फसला, चकमकीत नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त

विलय दिनी घातपाताचा डाव फसला, चकमकीत नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त

गडचिरोली: नक्षलवाद्यांकडून विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. भामरागड तालुक्यातील जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत नक्षलींचे शिबिर उद्ध्वस्त करण्यात आले. यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र चकमकीनंतर राबविलेल्या शोधमोहिमेत घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले.

भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मडवेली जंगल परिसरात रविवारी विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून घातपात करण्याची योजना आखली होती.

आयईडी, कुकर बॉम्ब केले नष्ट
चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले. त्यात घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे ३५ ते ४० नक्षलवादी शिबिर लावून होते असे दिसून आले. त्या ठिकाणावरून आयईडी, कुकर बॉम्ब, पिट्टू बॅग व नक्षल साहित्य पोलिसांच्या हाती लागले. त्यातील आयईडी व कुकर बॉम्ब बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने जागेवरच नष्ट करण्यात आले.

नक्षलवाद्यांनी केली एकाची गोळी झाडून हत्या
एटापल्ली : हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुरजागड गावातील सोमाजी चैतू सडमेक (५५) या शेतकऱ्याची नक्षल्यांनी गोळी झाडून शनिवारी रात्री हत्या केली. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून, त्यात जल, जंगल, जमिनीवर लोकांचा हक्क असल्याचे सांगत सुरजागड लोहखाणीला असलेला विरोध प्रकट करण्यात आला. तीन नक्षल्यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास सोमाजी यांच्या घरी जाऊन त्यांना झोपेतून उठविले. त्यांचे हात बांधून गावाबाहेर नेले व गोळी घातली. मृतदेह एटापल्ली ते गट्टा या मुख्य मार्गावर टाकून दिला. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सोडली.
 

 

Web Title: The Naxalite camp was destroyed in the encounter in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.