नक्षल कमांडरच्या वडिलांनी काढली जिवंत मुलाची अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 19:50 IST2018-07-27T19:49:57+5:302018-07-27T19:50:12+5:30
आपल्या मुलाने नक्षल चळवळीत सहभागी होऊन अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला.

नक्षल कमांडरच्या वडिलांनी काढली जिवंत मुलाची अंत्ययात्रा
एटापल्ली (गडचिरोली) : आपल्या मुलाने नक्षल चळवळीत सहभागी होऊन अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. त्याच्या या कृत्यामुळे तो नक्षल चळवळीत असेपर्यंत आपल्यासाठी मेला आहे, असे सांगत नक्षल कमांडर महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा या नक्षल कमांडरच्या वडिलांनी शुक्रवारी येथे त्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यात बरेच लोक सहभागी झाले होते.
२८ पासून सुरू होत असलेल्या नक्षलींच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने २५ ते २७ दरम्यान जनमैत्री मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सहभागी नागरिकांनी नक्षलवाद्यांमुळे नाहक त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे रेगडीगुट्टा येथील रहिवासी असलेले नक्षल कमांडर महेशचे वडील रावजी गोटा यांनी मुलाच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा पुतळा तयार करून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
ही अंत्ययात्रा महसूल मंडळ कार्यालयापासून मुख्य मार्गाने निघून शिवाजी चौकात पोहोचली. तिथे नक्षल कमांडर महेश आणि नक्षल डिव्हीजन कमांडर जोगन्ना उर्फ घिसू उर्फ चिमला उर्फ नरसय्या लिंगय्या रा. करीमनगर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी नक्षलवाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या. मुलगा महेश याने नक्षल चळवळीतून बाहेर येऊन आत्मसमर्पण करावे आणि सामान्य जीवन जगावे, अशी भावना त्याचे वडील रावजी गोटा यांनी व्यक्त केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप व एटापल्ली ठाण्याच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.