सोमवार ठरला अपघातवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:17 IST2018-01-15T23:16:27+5:302018-01-15T23:17:17+5:30
सिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका, आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली नाल्यावर व घोटजवळील चापलवाडा-मक्केपल्ली मार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

सोमवार ठरला अपघातवार
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका, आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली नाल्यावर व घोटजवळील चापलवाडा-मक्केपल्ली मार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे ठार तर तिघे जखमी झाले आहेत.
सिरोंचा - दुचाकी व जीपच्या अपघातात एक ठार व दोघे जखमी झाल्याची घटना सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावरील पेंटिपाका येथे सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घडली. आनंदम राजाराम राऊला (४०) रा. रोय्यलपल्ली जि. मंचरियाल (तेलंगणा) असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर या अपघातात राजू आनंदम राऊला (१८) रा. रोय्यलपल्ली व नवीन मल्लय्या दुर्गम (१८) रा. टेकडा ता. सिरोंचा हे दोघेजण जखमी झाले आहेत.
जखमींना सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आनंदम राऊला याचा मृत्यू झाला. उर्वरित जखमी राजू राहुला व नवीन दुर्गम या दोघांवर उपचार सुरू आहे. तेलंगणा राज्यातील रोय्यलपल्ली येथील आनंदम राऊला हा त्यांचा मुलगा राजू राऊला यांच्यासोबत सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला येथे रविवारी सायंकाळी आले. रात्री टेकडा येथील नातेवाईकांच्या घरी मुक्काम केला. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अंकिसाजवळच्या नडिकुडा येथील अन्य नातेवाईकाच्या भेटीसाठी निघाले. पेंटिपाकाजवळ पोहोचताच आसरअल्लीवरून विरूद्ध दिशेने सिरोंचाकडे येणाºया जिपला दुचाकीची धडक बसली. आनंदमच्या कपाळाला जोरदार मार बसला. तिनही जखमींना तत्काळ रुग्णालयात आणण्यात आले पण एकाचा मृत्यू झाला. सदर अपघातातील जीप व दुचाकी या दोन्ही वाहनांचा क्रमांक कळू शकला नाही.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
आष्टी : दुचाकीला कारने धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली नाल्यावर सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. राहुल कुमरे (२०) व सुनील आत्राम (२२) असे जखमी दुचाकीस्वारांची नावे आहेत. राहुल व सुनील हे चंदनखेडीवरून दुचाकीवरून लगामला जात होते. चौडमपल्ली नाल्यावर दुचाकी व कार यांची जबर धडक झाली. या धडकेत दुचाकीचा समोरच्या चक्क्याचा भाग दुचाकीपासून वेगळा झाला तर कारचा उजव्या बाजूचा हेडलाईट फुटून चाकालाही मार लागला. या धडकेमुळे राहुल व सुनील या दोघांच्याही डोक्याला व पायाला गंभीर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी पोलीस उपनिरीक्षक सपना चौधरी व पोलीस पथकाला पाठविले. दोघांनाही आष्टी ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता, दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉ. वलके यांनी दिली. कार चालक नामदेव मडावी रा. विहिरगाव ता. गडचिरोली हा आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार
घोट : चापलवाडा ते मक्केपल्ली मार्गावर दुपारी ३ वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विठ्ठल गंगा मक्केलवार (८०) रा. चापलवाडा याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विठ्ठल मक्केलवार हा दुपारी २ वाजता बकºयांना चारा आणण्यासाठी घरून निघाला. दरम्यान चापलवाडावरून येणाºया वाहनाने विठ्ठल मक्केलवार यांना जोरदार धडक दिली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.