'मी तुझ्याशीच लग्न करेन..' सांगून व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:51 IST2026-03-13T15:50:51+5:302026-03-13T15:51:34+5:30
Gadchiroli : कोरची तालुक्यातील एका गावात व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रेमाचे गुलाबी स्वप्न दाखवून, एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ११ मार्च रोजी उघडकीस आली.

Minor girl raped on Valentine's Day, saying 'I will marry you'
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील एका गावात व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रेमाचे गुलाबी स्वप्न दाखवून, एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ११ मार्च रोजी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी अजय टिल्लू कल्लो (२५) याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अजय याने पीडितेला तू मला आवडतेस, मी तुझ्याशीच लग्न करणार, असे सांगून विश्वासात घेतले होते. व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत त्याने पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केले. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. वैद्यकीय तपासणीत ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट होताच हे प्रकरण उजेडात आले.
रात्रीच ठोकल्या बेड्या
पीडितेने ११ मार्च रोजी कोरची पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. ११ मार्चच्या रात्रीच आरोपी अजय कल्लो याला अटक करण्यात आली. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन आठवड्यांत दुसरी घटना
कोरची तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची दोन आठवड्यांतील ही दुसरी घटना आहे. विकृत मानसिकतेच्या नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.