आरोग्य सहायकाकडून सव्वा लाखाची लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी जेरबंद; वेतन काढण्यासाठी दीड लाखांची मागणी

By संजय तिपाले | Updated: March 26, 2025 20:58 IST2025-03-26T20:57:52+5:302025-03-26T20:58:43+5:30

अतिदुर्गम लाहेरीत एसीबीची कारवाई

Medical officer arrested for accepting bribe of Rs 1.25 lakh from health assistant | आरोग्य सहायकाकडून सव्वा लाखाची लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी जेरबंद; वेतन काढण्यासाठी दीड लाखांची मागणी

आरोग्य सहायकाकडून सव्वा लाखाची लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी जेरबंद; वेतन काढण्यासाठी दीड लाखांची मागणी

गडचिरोली : आरोग्य सहायकाकडून थकीत वेतनाचे पुरवणी बिल काढण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करुन १ लाख ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. ही कारवाई २६ मार्च रोजी नक्षलप्रभावित व अतिदुर्गम लाहेरी (ता. भामरागड) प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.

डॉ. संभाजी भोकरे असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. तो नक्षलप्रभावित लाहेरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता. याच आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सहायकाचे फेब्रुवारी  ते सप्टेंबर २०२४ व नोव्हेंबर महिन्यातील १४ दिवसांचे रोखलेल्या पगाराचे पुरवणी बिल मंजूर करण्याकरता कार्यालयीन प्रमुख म्हणून डॉ. संभाजी भोकरे याचे ना- हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. प्रमाणपत्रासाठी डॉ.  भोकरे याने २ मार्च रोजी दीड लाख रुपयांची मागणी केली.

आरोग्य सहायकाने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे धाव घेतली. यानंतर उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो.नि. संतोष पाटील, शिवाजी राठोड व सहकाऱ्यांनी २५ मार्च रोजी लाच मागणी पडताळणी केली. त्यात डॉ. भोकरे याने तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार २६ रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदार आरोग्य सहायकाकडून रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने झडप मारुन डॉ. भोकरे यास पकडले. त्यास ताब्यात घेऊन लाचेची रक्कम जप्त केली. 

नक्षलप्रभावित भागात कारवाई यशस्वी

उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो.नि. संतोष पाटील, शिवाजी राठोड, सहायक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, राजेश पद्मगिरीवार, हवालदार किशोर जौंजारकर, स्वप्नील बांबोळे, अंमलदार संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, राजेश्वर कुमरे आदींनी कारवाई केली. दरम्यान, हा भाग अतिसंवेदनशील व नक्षलप्रभावित असल्याने डॉ. संभाजी भाेकरे यास गडचिरोलीला आणून गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

Web Title: Medical officer arrested for accepting bribe of Rs 1.25 lakh from health assistant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.