माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 06:22 IST2025-10-15T06:22:20+5:302025-10-15T06:22:37+5:30
मुख्यमंत्र्यांसमोर गडचिरोलीत आज शस्त्र ठेवणार, संविधान हाती घेणार; पत्नी ‘तारक्का’नेही केले होते आत्मसमर्पण, चार दशकांपासूनची दंडकारण्यातील चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर

माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातील दंडकारण्यात गेली अनेक वर्षे माओवादी चळवळीचा चेहरा राहिलेला वरिष्ठ जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू अखेर गडचिरोली पोलिसांसमोर भामरागड येथे शरण आला. तब्बल ६० सहकाऱ्यांसह त्याने आत्मसमर्पण केल्याची खळबळजनक माहिती १४ ऑक्टोबरला सकाळी समोर आली आहे. गडचिरोली पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नाही; पण, बुधवारी १५ ऑक्टोबरला मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शस्त्र खाली ठेवून तो हाती संविधान घेणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत माओवाद देशभरातून मुळासकट संपवू अशी घोषणा केलेली आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडसह महाराष्ट्रात माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये आक्रमक मोहिमा सुरू आहेत. अनेक महत्त्वाचे नेते चकमकीत ठार झाले तर काहींनी शस्त्र खाली ठेवले. या पार्श्वभूमीवर माओवादी चळवळीत उभी फूट पडल्याचेदेखील दिसून आले. भूपतीने युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता, यावरून माओवादी चळवळीतील त्याचे केंद्रीय नेतृत्वाचे सूर जुळेनासे झाले होते.
...तर गडचिरोली होणार माओवादमुक्त
जानेवारी २०२५ मध्ये भूपतीची पत्नी व केंद्रीय समिती सदस्य विमला सिडाम ऊर्फ तारक्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर अनेक जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करत शस्त्र सोडून हाती संविधान घेतले.
भूपतीदेखील शरणागतीच्या तयारीत असल्याची चर्चा होती. अखेर त्याने ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे.
दंडकारण्याच्या घनदाट जंगलात चार दशकांपासून टिकून असलेल्या माओवादी चळवळीचा हा शेवटचा टप्पा ठरू शकतो. यामुळे गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
१० कोटी + रुपयांचे बक्षीस माओवादी भूपतीच्या शीरावर आहे. तो महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यांत मोस्ट वाॅण्टेड होता.
स्फोटकांचा मोठा साठा जप्त : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या अड्ड्यावर छापा घालून सुरक्षा दलांनी स्फोटके व बॅरल ग्रेनेड लाँचर (बीजीएल) बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. त्याशिवाय माओवाद्यांनी पेरलेले पाच प्रेशर आयइडी बॉम्ब निकामी केले.
छत्तीसगडमध्ये सहा माओवाद्यांनी पत्करला शांत जीवनाचा मार्ग
हैदराबाद : छत्तीसगडमधील बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) पक्षाच्या सहा माओवाद्यांनी तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तेलंगणा सरकारचे आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरण, तसेच पोलिस व सीआरपीएफने सुरू केलेल्या ऑपरेशन चेयूता या संयुक्त सामाजिक उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या विकास व कल्याणकारी कामांमुळे प्रेरित होऊन या माओवाद्यांनी हिसेंचा मार्ग सोडून कुटुंबासह शांततेचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला, असे भद्राद्री कोठागुडेमचे पोलिस अधीक्षक बी. रोहित राजू यांनी म्हटले आहे.
३२६ माओवादी यावर्षी आतापर्यंत भद्राद्री कोठागुडेम जिल्हा पोलिसांना शरण आले आहेत.
या सर्व माओवाद्यांना पुनर्वसनासाठी तेलंगणा सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे.
ऑपरेशन चेयूताद्वारे नक्षलग्रस्त भागात रस्ते, शाळा, पिण्याचे पाणी, रुग्णालये, वीज आदी मूलभूत गरजांसाठी व्यापक विकासकामे सुरू आहेत.
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची हत्या
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी सत्ताधारी भाजपच्या एका कार्यकर्त्यांची हत्या केली. सत्यम पूनम असे त्याचे नाव असून, तो मुझलकोंकेर गावाचा रहिवासी होता. सोमवारी रात्री माओवाद्यांनी त्याचा गळा आवळून खून केला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. घटनास्थळी मिळालेल्या पत्रकात माओवाद्यांनी म्हटले आहे की, सत्यम पूनम याने पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करू नये असे त्याला तीनदा इशारे देण्यात आले होते. पण त्याने न ऐकल्याने हत्या करण्यात आली.