एक कोटीचा इनाम असलेला माओवादी 'गणेश'चा खात्मा ; ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील चकमकीत चार जण ठार
By संजय तिपाले | Updated: December 25, 2025 15:17 IST2025-12-25T15:14:04+5:302025-12-25T15:17:00+5:30
Gadchiroli : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या ओडिशा राज्यातील माओवादभावित भागात सुरक्षादलाने २५ डिसेंबर रोजी पहाटे मोठे यश मिळवले आहे.

Maoist 'Ganesh' carrying a bounty of Rs 1 crore killed; Four killed in encounter on Odisha-Chhattisgarh border
गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या ओडिशा राज्यातील माओवादभावित भागात सुरक्षादलाने २५ डिसेंबर रोजी पहाटे मोठे यश मिळवले आहे. ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील कंधमाल व गंजाम जिल्ह्याच्या सीमावर्ती जंगलात झालेल्या जोरदार चकमकीत दोन महिला माओवाद्यांसह चार माओवादी ठार झाले आहेत. यात संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य व एक कोटी रुपयांचा इनामी कुख्यात माओवादी कमांडर गणेश उईके (६०) याचाही समावेश आहे.
ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील चाकपाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत व गंजाम जिल्ह्याला लागून असलेल्या रांभा जंगल परिसरात ही चकमक झाली. विशेष गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ओडिशा स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG), सीआरपीएफ आणि बीएसएफच्या संयुक्त पथकाने मोठ्या प्रमाणावर नक्षलविरोधी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण २३ पथके सहभागी होती.
मोहिमेदरम्यान माओवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला, त्याला सुरक्षादलाने चोख प्रत्युत्तर दिले. चकमक संपल्यानंतर घटनास्थळावरून वर्दीधारी चार माओवादी, दोन पुरुष व दोन महिलांचे मृतदेह आढळून आले. याठिकाणाहून दोन इन्सास रायफल व एक .३०३ रायफलही जप्त करण्यात आली आहे. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये गणेश उईके आहे. उर्वरित तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
तीन दशकांपासून होती दंडकारण्यात दहशत
गणेश उईके हा गेल्या तीन दशकांपासून दंडकारण्यातील आंध्र प्रदेश, ओडिशासह छत्तीसगडच्या बस्तर भागात माओवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. अनेक गंभीर माओवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असून, त्याच्यावर ओडिशा व छत्तीसगड पोलिसांनी एक कोटी ते १.१ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान, या संपूर्ण कारवाईवर ओडिशा पोलिसांचे डीआयजी ऑपरेशन्स अखिलेश्वर सिंह यांनी थेट लक्ष ठेवले होते. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.